गुणाजी गावडे: गावकऱ्यांचा उत्साहात सहभाग..
⚡सावंतवाडी,ता.१०-:
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे हार्दिक स्वागत करत वेत्ये ग्रामपंचायतीने या अभियानात गावाचा उत्स्फूर्त सहभाग सुनिश्चित करून अव्वल स्थान मिळविण्याचा निर्धार केला आहे. या अनुषंगाने ग्रामपंचायतीतर्फे उत्तम नियोजन करून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सरपंच श्री. गुणाजी गावडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
या अभियानाचा शुभारंभ १७ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत करण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायतीतर्फे धार्मिक स्थळे व परिसर स्वच्छता (श्रमदान), “एक पेड माझ्या नावाने” या पुढाकारांतर्गत वृक्षारोपण, सेवा पंधरवडा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना अधिवास व जातीच्या दाखल्यांचे वाटप तसेच महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात गावाला पुरस्कार मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यासाठी शासनाने ठरविलेल्या सर्व निकषांची पूर्तता निर्धारित मुदतीत सामूहिक प्रयत्नातून करण्याचा संकल्प ठरावाद्वारे मंजूर करण्यात आला. गावकऱ्यांचा सहभाग व उत्साह याबद्दल सरपंचांसह उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी उपसरपंच श्री. महेश बाळा गावडे, माजी सरपंच तथा सदस्य श्रीमती स्नेहा मिठबावकर, श्री. भगवान रामा गावडे, श्री. राजेंद्र आंबेकर, श्रीमती नंदिनी निगुडकर, श्रीमती शितल खांबल, माजी सरपंच श्री. नरेंद्र मिठबावकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. गुरुदास गावकर, पोलीस पाटील श्री. जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. तेंडुलकर, मुख्याध्यापक श्रीमती गावित, आशा स्वयंसेविका श्रीमती ममता गावडे, आरोग्य सेवक दाढेल भाऊ तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती एस. व्ही. कदम यांनी अभियानाची माहिती, निकष आणि कार्यवाहीचे स्वरूप याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अभियानांतर्गत विविध विषय समित्यांची स्थापना करण्यात आली असून गावातील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच श्री. गुणाजी गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
