⚡सावंतवाडी दि.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेतर्फे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेचा निषेध व्यक्त करताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार केवळ वैयक्तिक हल्ला नसून भारताच्या न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर झालेला गंभीर आघात असल्याचे सांगितले.
या सभेस संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई, उपाध्यक्ष ॲड. विवेक मांडकुलकर, महिला उपाध्यक्षा नीलिमा गावडे, सचिव ॲड. यतिश खानोलकर यांच्यासह ॲड. अमोल सामंत, ॲड. नीता कविटकर, ॲड. बालाजी रणशूर, ॲड. अमोल कविटकर, ॲड. शाम सावंत, ॲड. शाम गोडकर, ॲड. अजित भणगे, जिल्हा सरकारी वकील ॲड. संदीप राणे, ॲड. उल्का पावसकर, ॲड. गौरव पडते तसेच अन्य अनेक वकील उपस्थित होते.
या प्रसंगी सर्व सदस्यांनी एकमुखाने या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच न्यायाधीशांच्या सुरक्षेबाबत शासन व पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे अशी विनंती केली.
वकील संघटनेने स्पष्ट केले की, न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा आधारस्तंभ असून तिच्या स्वातंत्र्याला कोणत्याही प्रकारचा धोका सहन केला जाणार नाही. न्यायव्यवस्थेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी सर्वांनी एकजूट दाखवण्याचे आवाहनही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
