कास येथील शेतात उभ्या ट्रॅक्टरची हत्तीकडून नासधूस…

शेतकरी, ग्रामस्थ हतबल : वनविभाग हत्तीचा कधी बंदोबस्त करणार..?

⚡बांदा ता.०४-:
गोव्यातून कास गावात दाखल झालेला ओमकार हत्ती दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर घालत आहे. शुक्रवारी शेतकरी शांताराम रामचंद्र राणे यांच्या कास-चाळ येथील शेतात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची या हत्तीने मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. यामुळे ट्रॅक्टर वापरण्यायोग्य न राहिल्याने राणे यांचे अंदाजे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाल्याचे समजते. एवढेच नव्हे तर भात शेती आणि भाजीपाल्याचाही हत्तीने मोठा फडशा पाडला आहे.
घटनास्थळी पंचनामा करण्यास वन विभागाने अद्यापही पाठ फिरवली असून शेतकऱ्यांमध्ये याबाबत संतापाचे वातावरण आहे. सकाळच्या वेळी हा हत्ती शेतात उतरत असून भात खाऊन नंतर डोंगराळ भागात निघून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस पिकांचे रक्षण करण्याची मोठी चिंता भेडसावत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

सद्यस्थितीत ओमकार हत्ती सातोसे लिंगेवाडी येथे दिसून आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. मात्र हत्तीचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तत्काळ ठोस उपाययोजना करून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

चौकट करणे ——
शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार : प्रवीण पंडित

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हत्तीच्या पायदळी तुडवला जात आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढणे ही शासनाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि योग्य ती नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. यासाठी आपण कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे कास गावाचे सरपंच प्रवीण पंडित यांनी सांगितले.

फोटो ——
कास : हत्तीने ट्रॅक्टरची केलेली नासधूस.

You cannot copy content of this page