⚡सिंधुदुर्गनगरी ता ४-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची घोषणा आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केली. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांसाठी एकूण २१ प्रस्ताव प्राप्त झाले होते.यापैकी प्रत्येक तालुक्यातून एक या प्रमाणे ८ शिक्षकांची निवड या पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषद घेत आज जिल्ह्यातील उत्कृष्ट प्राथमिक शिक्षक पुरस्कार जाहीर केले. यावेळी त्यांच्यासोबत प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा उत्कृष्ट शिक्षक म्हणून गौरव करण्यात येतो. यावेळी यासाठी एकूण २१ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यामध्ये देवगड २, दोडामार्ग २,कणकवली ४, कुडाळ ४, मालवण २ ,सावंतवाड़ी ३ ,वैभववाडी १, वेंगुर्ला ३ अश्या प्रस्तावांचा समावेश होता . या प्राप्त प्रस्तावातील प्रत्येक शिक्षकांच्या दोन टप्प्यात मुलाखती घेऊन ते करत असलेल्या शैक्षणिक उठावासाठी तसेच प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेले उपक्रम आदी सर्व बाबींचा विचार करून अंतिम ८ जणांची निवड करून याबाबतचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी विभागीय कोकण आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आला होता. कालच याची मंजुरी मिळाल्यानंतर आज या पुरस्कारांची घोषणा करत असून,लवकरच विशेष कार्यक्रम घेऊन या सर्व उत्कृष्ट काम केलेल्या शिक्षकांचा पुरस्कार प्रदान कार्यक्रम करण्यात येईल.
प्राप्त झालेल्या पुरस्कारांमध्ये कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ चे पदवीधर शिक्षक विनायक शंकर जाधव, सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा मांडखोल नंबर १ चे पदवीधर शिक्षक विलास रामचंद्र फाले, दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळये चे उपशिक्षक उदय विठ्ठल गवस, वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मठ कणकेवाडी नंबर ३ चे उपशिक्षक रामा वासुदेव पोळजी, कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय माणगाव चे उपशिक्षक बाबाजी सुरेश भोई, देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिर्ये नंबर १ चे उपशिक्षक संजय शामराव पाटील,वैभववाडी तालुक्यातील पीएम श्री दत्त विद्या मंदिर वैभववाडी चे उपशिक्षक दिनकर शंकर केळकर, तर मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेरी मळा चे उपशिक्षक चंद्रकांत गणपती कदम यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
हे पुरस्कार जाहीर करताना प्रस्ताव प्राप्त सर्वच शिक्षक उत्कृष्ट काम करणारे होते त्यामुळे या पुरस्कारांसाठी स्पर्धा निर्माण झाली. सर्व शिक्षकांनी उत्कृष्ट काम केलेले दिसून आले असले तरी त्यात सर्वोत्कृष्ठ ठरलेल्या ८ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. तेव्हा प्रस्ताव प्राप्त सर्व शिक्षकांनी यापुढेही असेच आपल्या कामाचे सातत्य ठेवून चांगली सेवा द्यावी.