कणकवली पोलिसांनी केली कारवाई :या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले..
कणकवली : तालुक्यातील कासार्डे – आनंदनगर येथील जंगलमय भागात शुक्रवारी सायंकाळी कणकवली पोलिसांनी कारवाई करत तब्बल एक लाख चौसष्ट हजार चारशे पन्नास रुपयांची गोवा बनवटीची दारू जप्त केली. सायंकाळी ६.१० वा. सुमारास करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस रवींद्र भांबुरे (३२, रा. तळेरे – बाजारपेठ), सागर डंबे (रा. तळेरे), गुरू पाटील (रा. सावंतवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे, कासार्डे दूर क्षेत्राचे हवालदार चंद्रकांत झोरे, हवालदार पांडुरंग पांढरे, कॉस्टेबल स्वप्नील जाधव यांनी केली.
मागील काही दिवसांत कणकवली तालुक्यात अवैध दारू विक्रीवर झालेल्या कारवायांपैकी ही देखील एक मोठी कारवाई आहे. त्यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कासार्डे-आनंदनगर येथे जंगलमय भागात गोवा बनावटीच्या दारूची विक्री सुरू असल्याची टीप कासार्डे दूरक्षेत्राचे हवालदार चंद्रकांत झोरे यांना मिळाली. त्यानुसार झोरे व स्वप्नील जाधव यांनी आनंदनगर येथील जंगलमय भाग गाठला. तेथे तेजस भांबुरे हा गोवा बनवाटीची दारू बाळगलेल्या स्थितीत आढळून आला. वेगवेगळ्या मापांच्या, वेगवेळ्या कंपन्यांच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या.
दरम्यान यावेळी पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे, पांडुरंग पांढरे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
सदरची दारू सागर डंबे याच्या मालकीची असून ती गुरू पाटील याने आपल्यापर्यंत पोहोचवली असे संशयित तेजस भांबुरे यांनी पोलीस चौकशीत सांगितले. चौकशीअंती स्वप्नील जाधव यांच्या फिर्यादीनुसार वरील तीन संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.