सावंतवाडी शहराच्या विकासाकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष…

राजू कासकर यांचा आरोप:शहरात मुख्याधिकारी नसल्याने विकासाला खीळ बसली..

⚡सावंतवाडी ता.३१-: एकेकाळी पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या सावंतवाडी शहराकडे सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून, आरोग्य आणि नागरी समस्यांकडे हेतुपूर्वक कानाडोळा केला जात असल्याचा गंभीर आरोप मनसे शहर अध्यक्ष राजू कासकर यांनी केला आहे.

शहरात मुख्याधिकारी नसल्याने विकासाला खीळ बसली असून, अनेक महत्त्वाचे प्रकल्प धूळ खात पडले असल्याचेही कासकर यांनी म्हटले आहे.
मनसेच्या मते, सावंतवाडी शहराच्या वैभवात भर घालणारा मोती तलाव सध्या समस्यांनी ग्रासलेला आहे. तलावाकाठचा फुटपाथ निसरडा झाल्याने पहाटे फिरायला जाणारे अनेक नागरिक पडून जखमी झाले आहेत. याबद्दल वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप कासकर यांनी केला.
शहरात लाखो रुपये खर्च करून आणि मोठा गाजावाजा करून सुरू केलेले अनेक प्रकल्प सध्या केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे. डास निर्मूलन मोहीम देखील राबवण्यात आलेली नाही, त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
कासकर यांनी पुढे म्हटले की, नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी शहराला मुख्याधिकारीच नाही. त्यामुळे सावंतवाडी शहराचा कारभार सध्या “रामभरोसे” सुरू असून, स्थानिक आमदार आणि पालकमंत्री यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सत्ताधारी सध्या केवळ एकमेकांचे कार्यकर्ते पळवण्यात व्यस्त असल्याचा टोलाही राजू कासकर यांनी लगावला. सावंतवाडीच्या विकासाबाबत सत्ताधाऱ्यांच्या उदासीन धोरणाबद्दल शहरात नाराजीचे वातावरण आहे.

You cannot copy content of this page