ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीर नेतृत्व करणाऱ्या सुभेदार मेजर संजय सावंत यांचा भोसले नॉलेज सिटीतर्फे सन्मान…

“देशसेवा ही सीमारेषेपुरती मर्यादित नाही, शिक्षणातूनही ती शक्य;मेजर सावंत..

⚡सावंतवाडी ता.२३-: भोसले नॉलेज सिटी येथे भारतीय सैन्यातील सुभेदार मेजर संजय सावंत यांचा सन्मान सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ‘ऑपरेशन सिंदूर’ या अत्यंत संवेदनशील लष्करी मोहिमेत सहभागी होत सुमारे साडेआठशे जवानांचे नेतृत्व करणाऱ्या या वीर अधिकाऱ्याने आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना देशभक्तीची प्रेरणा दिली. मेजर सावंत यांनी आपल्या भाषणात ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देताना लष्करी जीवनातील शिस्त, समर्पण आणि देशसेवेची मूल्यं प्रभावीपणे मांडली. “तुम्ही देशाचे भविष्य आहात. ज्या क्षेत्रात काम कराल, तिथे सर्वोत्तम कामगिरी करून देशसेवा करा!” असे आवाहन करत विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाचे बीज रोवले._

गावकुसा बाहेर पडून देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या मेजर सावंत यांचा जन्म कारिवडे गावात झाला. त्यांनी आपल्या लष्करी प्रवासातील संघर्ष आणि यशाची प्रेरणादायी कहाणी सांगताना उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमात भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मेजर सावंत यांचा गौरव करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना मेजर सावंत म्हणाले, “देशसेवा ही केवळ सीमारेषेवर नव्हे, तर शिक्षण क्षेत्रातूनही करता येते. चराठे सारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे हे बीकेसीचे कार्य एकप्रकारची देशसेवाच आहे.”

यावेळी “भारत माता की जय”, “जय भवानी जय शिवाजी” या घोषणांनी सभागृहातील वातावरण भारावून गेले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, सर्व विभाग प्रमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक प्रेरणादायी, ऊर्जादायी आणि देशप्रेम जागवणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनात नवी उमेद आणि ध्येय निर्माण करणारा ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर प्रभू यांनी केले.

You cannot copy content of this page