⚡सावंतवाडी ता.२२- : संविधानिक हितकरिणी महासंघाच्यावतीने येत्या शनिवार, २६ जुलै रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ‘समाज संवाद आणि समस्या निवारण मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन कक्षात शासन आणि प्रशासनाच्या प्रतिनिधींसमवेत हा मेळावा होणार आहे.
समाजबांधवांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात घेऊन याव्यात, असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर यांनी केले आहे.
अनुसूचित जातीतील लोकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. बौद्ध दीक्षित आणि बौद्ध दीक्षा घेतली नसलेल्या समाजाचे सुद्धा प्रश्न प्रशासनाकडून सुटत नाहीत. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली होती. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर हे प्रश्न सुटू शकतात, अशी आशा आहे. यामुळेच शनिवार, २६ जुलै रोजी हा समाज संवाद आणि समस्या निवारण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री राणे यांनी याकरिता वेळ दिल्याबद्दल परूळेकर यांनी त्यांचे आभार मानले.
अनेकांचे प्रश्न किरकोळ कारणामुळे प्रलंबीत आहे. अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांच्या किंवा सक्षम अधिकाऱ्यांच्या सूचना मिळताच ते प्रश्न सुटू शकतात आणि म्हणूनच या मेळाव्यात पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाचे प्रत्येक खात्याचे अधिकारी अशी प्रश्नांची समोरासमोर मांडणी करून ते सोडविले जाणार आहेत. स्मशानभूमी, जातीवाचक गावांची नावे बदलणे, समाजमंदिर उभारण्यासाठी निधी, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन जिल्हा स्तरावर व्हावे, अशा मागण्या या मेळाव्यात करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी कार्याध्यक्ष रमाकांत जाधव म्हणाले की, समाजाचे हित हा संघटनेचा मुख्य हेतू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महामंत्र जपण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. एका झेंड्याखाली एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने संविधानिक हितकरिणी महासंघाची संकल्पना पुढे आली असून, जिल्ह्यात आमचे मजबूत संघटन निर्माण झाले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला संविधानिक हितकरिणी महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर, कार्याध्यक्ष रमाकांत जाधव, जिल्हा संघटक अंकुश जाधव, महासचिव गौतम खुडकर, उपाध्यक्ष प्रभाकर जाधव, वासुदेव जाधव, शंकर जाधव, सत्यवान तेंडोलकर, विनोद कदम, मंगेश गावकर, मधुकर जाधव आदी उपस्थित होते.