⚡सावंतवाडी ता.२२-: सांगली येथील केपीज बुदधिबळ ॲकेडमीने आयोजित केलेल्या खुल्या बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ करत सहा पारितोषिके पटकावली. जागतिक बुदधिबळ संघटना फिडेच्या एकशे एकव्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवर्य कुमार पांडुरंग माने यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सहा राज्यातील आणि पाच देशातील तब्बल सहाशे खेळाडूंनी सहभाग घेतला. नऊ, तेरा वर्षाखालील आणि खुल्या गटात स्पर्धा खेळविण्यात आली. सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या आठ वर्षापासून चौदा वर्षांच्या अकरा विदयार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेत आठ राऊंड्स खेळविण्यात आले.
तेरा वर्षाखालील गटात विराज दळवी आणि चिदानंद रेडकर यांनी सहा राऊंड्स जिंकून अनुक्रमे अठरावा आणि वीसावा क्रमांक मिळवला. अथर्व वेंगुर्लेकर याने पाच विजय व एक राऊंड बरोबरीत सोडवला. लिएण्डर पिंटो आणि हर्ष राऊळ यांनी पाच विजय मिळवले. खुल्या गटात पार्थ गावकर याने चार विजय मिळवून पंधरा वर्षाखालील गटात आठवा क्रमांक मिळवला. या सर्व विदयार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. ॲकेडमीचे आठ वर्षीय विदयार्थी स्वराज सावंत, प्रज्वल नार्वेकर, दक्ष वालावलकर यांनी पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत खेळताना उत्कृष्ट खेळ करुन चार-चार विजय मिळवले. साक्षी रामदुरकर हीने तीन विजय मिळवले. विशेष म्हणजे मुक्ताई ॲकेडमीला “बेस्ट ॲकेडमी” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार चार वेळा मिळवणारी मुक्ताई ॲकेडमी ही जिल्ह्यातील एकमेव ॲकेडमी ठरली आहे. सर्व विदयार्थ्यांना मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि ॲकेडमीचे राष्ट्रीय प्रशिक्षक श्री.उत्कर्ष लोमटे सर यांचे मार्गदर्शन मिळाले. सर्व स्तरातून विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
सांगलीतील खुल्या बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीला “बेस्ट ॲकेडमी” पुरस्कार…!
