⚡सिंधुदुर्गनगरी ता.२१-: भारतीय कृषी विमा कंपनी यांनी हवामान आधारित पुनर्रचित फळ पिक विमा योजना 2024-25 अंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांची विमा नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पिक विमा संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना व हवामान आधारित पुनर्रचित फळ पिक विमा योजना याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे, भारतीय कृषी विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक अतुल झनकर, स्कायमेट वेदर सर्व्हिसेस चे विनायक पाटील, कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बडे उपस्थित होते.
या बैठकीत सुपारी या पिकाचा विमा शेतकऱ्यांना काढता यावा यासाठीचा प्रस्ताव, हवामान आधारित फळ पिक विमा योजना यामध्ये विविध निकष सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुधारित करून त्याचा प्रस्ताव, तसेच आंबा तसेच काजू लागवड शेतकऱ्यांचे पोट खराब क्षेत्र पिक विमा मध्ये समाविष्ट करणे , ई पीक पाहणी ची अट शिथिल करणे इत्यादी बाबींसाठी देखील राज्यस्तरावर प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
००००००