अखेर माने कुटुंबीयांना अटकपूर्व जामीन मंजूर…

जिल्हा न्यायालयाचा दिलासा:प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण..

ओरोस ता २१
सावंतवाडी माठेवाडा येथील प्रिया चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झालेल्या देवगड येथील संशयित आरोपी प्रणाली माने, आर्य माने आणि मिलिंद माने यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही एस देशमुख यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. संशयितांच्या वतीने वकील अॅड. संग्राम देसाई, ॲड उमेश सावंत, अॅड. सुहास साटम, ॲड. जान्हवी दुधवडकर यांनी काम पाहिले.
सावंतवाडी माठेवाडा येथील प्रिया चव्हाण या विवाहित महिलेने आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. या आत्महत्ये प्रकरणी प्रिया चव्हाण यांच्या आई वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रिया चव्हाण हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुरुवातीला देवगड येथील प्रणाली माने आणि आर्य माने या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आपल्याला अटक होऊ नये यासाठी प्रणाली माने आणि आर्य माने यांनी येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. ८ जुलै रोजी या दोघांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करीत या अर्जावर ११ जुलै रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय जाहीर केला होता.
त्यानुसार ११ जुलै रोजी पुन्हा न्यायालयाने या दोन्ही संशयितांना मंजूर केलेल्या अंतरिम अटकपूर्व जामिनाची मुदत १५ जुलै पर्यंत वाढविली आहे. दरम्यान, याच प्रकरणी देवगड येथील मिलिंद माने यांच्या विरोधात सुध्दा मागाहून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनीही अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार जिल्हा न्यायालयाने मिलिंद माने यांनाही दिलासा देताना १५ जुलै पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. यानंतर अंतरिम अटकपूर्व जामिनाची मुदत १८ जुलै पर्यंत वाढविण्यात आली होती. अखेर आज या तिन्ही संशयितांच्या अर्जावर जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही एस देशमुख यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने या तिघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे.

You cannot copy content of this page