⚡मालवण ता.१२-:
आई, वडील हे आपले पहिले गुरू आहेत तर शाळेत आपल्याला विद्यादान करत घडविणारे शिक्षक हे दुसरे गुरू आहेत. त्यामुळे आपल्या गुरुंप्रती आदर व्यक्त करतानाच विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करायला हवा असे प्रतिपादन मालवण येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत यांनी येथे केले.
सौ. शिल्पा खोत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत दरवर्षी प्रमाणे मालवण येथील कन्याशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप केले. या कार्यक्रमास श्रीकांत मालवणकर, अमन, दिपा पवार, दादा वेंगुर्लेकर, शांती तोंडवळकर, राहुल, प्रशालेच्या आनंदी घोगळे, श्रद्धा गोसावी, शिवानी पाटकर, आकांक्षा कासले, प्रियांका वराडकर, नेत्रा तिळवे यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते.
सौ. घोगळे यांनी गुरुपौर्णिमा दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. शिल्पा खोत यांच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत दरवर्षी त्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत असल्याबद्दल सौ. खोत यांचे प्रशालेच्या वतीने आभार मानले.