नारायण उर्फ बबन राणे यांची मागणी: अन्यथा शिवसेना ‘रास्ता रोको’ करणार..
⚡सावंतवाडी ता.०२-: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे (MSRTC) धारगळ, गोवा येथील आयुष्मान भारत आयुर्वेदिक रुग्णालयाच्या जवळ एसटी थांबा मंजूर करण्यात यावी अशी मागणी शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी केली आहे. दरम्यान या मागणीची तात्काळ पूर्तता न झाल्यास शिवसेना ‘एसटी रोको’ आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राणे यांनी सावंतवाडी आगाराच्या विभागीय व्यवस्थापकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सावंतवाडी तालुक्यातील विविध गावांमधून शेकडो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक दररोज धारगळ येथील आयुष्मान भारत आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी येतात. सध्याचा एसटी थांबा रुग्णालयापासून खूप दूर असल्याने, रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना चालत जावे लागते, ज्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
या त्रासावर उपाय म्हणून, राणे यांनी विनंती केली आहे की, एसटी थांबा थेट रस्त्याच्या पुढील बाजूस, रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळील चौकात स्थलांतरित केला जावा. यामुळे रुग्णांना रुग्णालयात ये-जा करणे सोयीचे होईल आणि त्यांची गैरसोय दूर होईल.
या मागणीची लवकरात लवकर दखल घेऊन बस थांबा मंजूर करण्याची विनंती राणे यांनी केली आहे. अन्यथा, शिवसेनेच्या वतीने ‘एसटी रोको’ आंदोलन करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी, असा नम्र इशाराही त्यांनी दिला आहे.