कुडाळ : एस्. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी, पाट येथील एस्. एल्. देसाई विद्यालय , कै. एस्. आर्. पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै. डॉ.विलासराव देसाई कला, वाणिज्य व विज्ञान उच्च महाविद्यालय,कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये माजी संस्था कार्याध्यक्ष कै. रामचंद्र रघुनाथ रेडकर (गुरुजी ) यांना पाट हायस्कुलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेमध्ये आदरांजली वाहण्यात आली.
संस्थेचे माजी कार्याध्यक्ष कै. रामचंद्र रघुनाथ रेडकर (गुरुजी) यांच्या शोकसभेचे आयोजन पाट हायस्कुल मध्ये करण्यात आले होते. सार्वजनिक कामांमध्ये जेथे श्रेय घ्यायचे नसते तेथे श्रेय न घेणारे असे आमचे रेडकर गुरुजी एक थोर व्यक्तिमत्व होते .अतिशय साध्या स्वभावाचे तसेच आपल्या मृत्यूची पर्वा न करता शाळेसाठी, संस्थेसाठी झटणारा निस्वार्थी मनुष्य मी आजपर्यंत पाहिला नाही; अशा शब्दात माजी संस्था पदाधिकारी सुधीर ठाकूर यांनी श्रद्धांजली वाहिली. प्रशालेतील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा प्राप्त करून देता येतील ते सुद्धा कमी खर्चात याचा विचार सतत रेडकर गुरुजी करत होते. त्याचबरोबर संस्थेचा पैसा कसा काटकसरीने वापरायचा याचेही कौशल्य त्यांनी आत्मसात केले होते आणि या संदर्भातील मार्गदर्शन ते सर्व आम्हा संस्था पदाधिकाऱ्यांना सतत करत असायचे. आम्ही त्यांच्या या अशा विचारांतूनच शिकलो असे भावपूर्ण मनोगत माजी संस्था कार्याध्यक्ष समाधान परब यांनी व्यक्त केले.
एक पितृतुल्य आदर्श व्यक्तिमत्व, मितभाषी असलेल्या गुरुजींच्या विचारांच्या पावलावर पाऊल ठेवून संस्थेचे कामकाज यापुढेही चालू राहील हीच त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल ;असे संस्था पदाधिकारी राजेश सामंत आपल्या शोकसंदेशात म्हणाले. 2012 ते 2022 या कालावधीत कार्याध्यक्ष असताना कै. रेडकर गुरुजी यांनी तन-मन धन अर्पण करून शाळेची व संस्थेची सेवा केली .आपल्या पेन्शन मधील काही रक्कमही त्यांनी शाळेसाठी नियमित दिली होती.
या शोकसभेला प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, ज्येष्ठ शिक्षक तानाजी काळे, विजय मेस्त्री,सौ.यज्ञा साळगांवकर, तुषार आंबेरकर ,माडयाची वाडीचे शिक्षक श्री. घाडीगांवकर ,ज्येष्ठ शिक्षक संदीप साळसकर यांनी आपल्या शोकसंवेदना आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.
गुरुजींच्या कुटुंबीयांनी या शोकसभेच्या वेळी प्रशालेतील आदर्श विद्यार्थ्यासाठी बक्षीस जाहीर केले . या शोकसभेला संस्था कार्याध्यक्ष देवदत्त साळगांवकर, सचिव विजय ठाकूर, खजिनदार दीपक पाटकर, राजेश सामंत, सुधीर मळेकर,महेश ठाकूर, नारायण तळवडेकर हे सर्व संस्था पदाधिकारी तसेच अशोक रेडकर, विठ्ठल रेडकर (गुरुजींचे कुटुंबीय) मंगेश कोळंबकर, अभिजीत पाटकर, राजाराम मेस्त्री, संजय पाटकर, अशोक पाटकर इत्यादी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
माजी कार्याध्यक्ष रेडकर गुरुजीना पाट हायस्कूलमध्ये आदरांजली…
