रुपेश राऊळ: लाखोंचे नुकसान, कवडीमोल भावाने भरपाई, शेतकरी चिंताग्रस्त..
⚡सावंतवाडी ता.१९-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात वन्यप्राण्यांमुळे बागायती,शेतीत होणाऱ्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. हत्ती, गवा रेडा, रानडुक्कर, वानर, माकड, शेकरू आणि मोरांसारख्या वन्यजीवांनी शेती व बागायतींमध्ये धुडगूस घालून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. या नुकसानीच्या तुलनेत मिळणारी भरपाई अत्यंत तुटपुंजी असून, ती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशासनाच्या दारात हेलपाटे घालावे लागत आहेत. यामुळे बागायतदार आत्महत्येचा विचार करतील अशी भीती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी वन, कृषी आणि ग्रामविकास खात्याने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
वन्यप्राण्यांमुळे शेतीचे अतोनात नुकसान
दोडामार्ग तालुका घनदाट जंगलाने वेढलेला असून, तो वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. भात, नाचणी, नागली, केळी, नारळ, सुपारी तसेच विविध फळझाडे ही येथील मुख्य पिके आहेत. याशिवाय, बांबू आणि नागलीच्या पिकांपासूनही शेतकऱ्यांना वार्षिक उत्पन्न मिळते. मात्र, सध्या वन्यप्राण्यांमुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. माकड आणि शेकरूपासून होणाऱ्या नुकसानीसाठी भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेऊन दहा वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी, त्याची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल राऊळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रत्येक शेतकऱ्याचे सरासरी २ ते ४ लाख रुपयांचे नुकसान होत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. उत्पन्नात घट झाल्याने भविष्याची चिंता वाढली आहे. अनेकदा शेकडो वानर आणि माकड थेट शेतकऱ्यांच्या बागायतीत घुसूनही नुकसान करत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असली तरी, प्रशासनाकडे तक्रार करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याची शेतकऱ्यांची खंत आहे. यामुळे काही शेतकऱ्यांनी तर शेती करणेच सोडून दिले आहे, असे राऊळ यांनी सांगितले. उपजिविकेचे साधन शेती व बागायती असलेल्या शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या समस्या आणि शासनाकडे मागणी
वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान केवळ पिकांपुरते मर्यादित नसून, ते थेट शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम करत आहे. शासकीय स्तरावर या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. घाटामाथ्यावरील शेतकरी आत्महत्येसारखे प्रकार करतात ,मात्र दोडामार्ग तालुक्यात तसे घडत नसल्याने प्रशासन या नुकसानीची दखल घेत नाही, अशीही शेतकऱ्यांची तक्रार आहे.
तातडीच्या उपाययोजनांची गरज;
शेतकरी आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. रुपेश राऊळ यांनी मागणी केली आहे की, वनविभागाने वन्य पशू-पक्षी जंगलातच कसे राहतील यासाठी संशोधन करून त्याची अंमलबजावणी करावी. तसेच, झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी. तुटपुंज्या नुकसान भरपाईचा फेरविचार करावा. प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महागाईचा निर्देशांक लावून नुकसान भरपाई मिळेल अशी तरतूद करावी.शेती व बागायती पिकांच्या कायमस्वरूपी संरक्षणाची उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकरी आत्महत्या करतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि नुकसान भरपाईसाठी योग्य धोरणे आखणे ही काळाची गरज आहे, असे रुपेश राऊळ यांनी म्हटले आहे.