ग्रामस्थ व पालकांची मागणी..
⚡मालवण ता.१८-:
मालवण तालुक्यातील जि. प. नांदरुख-आंबडोस शाळेला गेल्या काही वर्षांपासून पूर्ण वेळ शिक्षक न मिळाल्यामुळे या शाळेची पटसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे बदली किंवा भरती प्रक्रियेत उपशिक्षक १ व पदवीधर १ अशी रिक्त पदे दाखवावीत, कायमस्वरूपी उपशिक्षक व पदवीधर शिक्षकांची नियुक्ती शाळेवर करावी, अशी मागणी नांदरुख येथील ग्रामस्थ व पालक वर्गाने गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नांदरुख येथील ग्रामस्थ व पालक यांनी गटशिक्षणाधिकारी संजय माने यांची भेट घेऊन जि. प. नांदरुख-आंबडोस शाळेला पूर्णवेळ शिक्षक नसल्याबाबत लक्ष वेधले. यावेळी माजी सरपंच दिनेश चव्हाण, माजी उपसरपंच विकास चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य समीर पाटकर, सलोनी पाटकर, गजानन चव्हाण, विनोद चव्हाण, विलास चव्हाण, साक्षी कांबळी, अक्षता पाटकर, पूर्वा चव्हाण, संचिता चव्हाण, सुजाता भगत, अश्विनी चव्हाण आदी उपस्थित होते.
शाळेतील सहावी व सातवीचे वर्ग टिकून राहावेत, म्हणून आमची मुले आम्ही याच शाळेत पाठविण्याचे ठरविले आहे. परंतु, गेल्या २ वर्षांपासून एकही पदवीधर शिक्षक न मिळाल्यामुळे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याविषयी संभ्रमावस्थेत आहोत. भरती, बदली प्रक्रियेवेळी शाळेत रिक्त जागा न दाखविल्यामुळे कोणतेही शिक्षक शाळेत येऊ शकले नाहीत. त्यामुळे आमची मागणी मान्य करून कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करून द्यावा, असे यावेळी ग्रामस्थ व पालकांनी सांगितले.