नितेश राणे ः कोकण किनारपट्टी विकासासाठी २५ हजार कोटींची तरतूद..
कणकवली, ता.१४ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सर्व क्षेत्रात प्रगती साध्य केली आहे. सन २०१४ पूर्वीच्या पंतप्रधानांबाबत होणारी चर्चा आणि मोदींबाबत होणारी चर्चा जमीन-आस्मानाचा फरक आहे. विदेशात मोदींबाबत प्रचंड सन्मान वाढला आहे. आतंकदवाद असेल अथवा नक्षलवाद सर्वांना कडक संदेश मोदींनी दिला आहे. त्याचबरोबर विकासाची घौडदौड देखील मोदींनी सुरू ठेवला आहे. त्यामुळेच कोकण किनारपट्टीच्या विकासासाठी २५ हजार कोटींची तरतूद केली आहे. पुढील काळात मोदींच्या नेतृत्वाखाली भारत निश्चितपणे महासत्ता बनेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी आज व्यक्त केला.
मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथील प्रहार भवन मध्ये श्री.राणे यांन पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मनोज रावराणे, लखनराजे भोसले, समीर नलावडे, संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.
श्री.राणे म्हणाले, अॉपरेशन सिंदूर नंतर आपल्या देशाकडे किंवा अतिरेकी संघटना असोत वाकड्या नजरेने पाहिलं तर जशाच तसं उत्तर दिलं जातंय अशी प्रतिमा मोदींच्या नेतृत्वाखाली तयार झाली आहे. पहेलगाम हल्ला झाल्यानंतर तातडीने भारताने पाकिस्तानमधील अड्ड्यांना नष्ट केलं. पाकिस्तान म्हणत होतं की आम्ही आतंकवाद्यांना स्थान देत नाही. पण पाकिस्तानची पोलखोल भारताने केली. एवढंच नव्हे तर चीन, बांग्लादेशालाही भारताने आपण वेगळे आणि कणखर आहोत असा संदेश दिला आहे. नक्षलवाद्यांनाही मोदींच्या नेतृत्वाखालील सैन्याने,पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.
ते म्हणाले, गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नक्षलमुक्त भारताकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. काँग्रेस कालावधी किंवा सन २०१४ पूर्वी आपण फक्त देशातील समस्या ऐकायचो. पण गेल्या ११ वर्षात कधीही न सुटणारे, वर्षानुवर्षे प्रलंबित असणारे प्रश्न मोदींच्या कणखर नेतृत्वामुळे सुटताना दिसत आहेत. ३७० कलम असाे किंवा राममंदिराचा प्रश्न असो किंवा शासकीय योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचविण्यात मोदी सरकार यशस्वी झाले आहे. पूर्वी कुठलीही मोठी योजना जाहीर झाली की त्या योजनेचे पैसे अमूक सरकारने, तमूक सरकारने खाल्ले असे ऐकायचो. पण मोदी सरकारच्या कालावधीत योजनांचे पैसे थेट लाभार्थींच्या बँक खात्यात पोचत आहेत. असा भारत यापूर्वी कधीही इथल्या जनतेने पाहिला नव्हता.
श्री.राणे म्हणाले, कोविड काळात जेव्हा आपल्या हातात एकही रूपया नव्हता. तेव्हा मोदी सरकारने शेतकरी सन्मान योजना सुरू केली आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट सहा हजार रूपये जमा केले. गोरगरीब लोकांना अन्न,धान्याचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. तेव्हा मोफत अन्नधान्य देण्याचा क्रांतीकारी निर्णय मोदी सरकारने घेतला आणि आजही त्याची अंमलबजावणी सुरू आहे. विकासाच्या क्षेत्रातही, रोजगाराच्या क्षेत्रातही भारत प्रगती करताना दिसतोय. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतोय. मोठमोठ्या कंपन्या भारतात आपले उद्योग सुरू करत आहेत. फेसबुक, ॲपल आपला कारखाना लावताना अमेरिकेपूर्वी ते भारताचा विचार करतात. हीच मोदींनी निर्माण केलेली विश्वासार्हता आहे. समाजाच्या सर्व घटकांना, वर्गाला न्याय देण्याचे काम मोदींनी आपल्या ११ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये यशस्वीरित्या केले आहेत.
किनारपट्टी विकासासाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये २५ हजार कोटी तरतूद केली आहे. सागरमाला सारख्या असंख्य योजना पूर्ण किनारपट्टी विकसित होताना दिसत आहे. कुठलं असं एक क्षेत्र नाही की मोदींनी समाधान दिलं नाही असं झालेलं नाही. सामान्य व्यक्तीला समृद्ध करण्याचं काम मोदींच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. मोदी सरकारची ११ वर्ष प्रत्येक व्यक्तीसाठी गौरवपूर्ण बाब आहे. सन २०१४ पूर्वीच्या पंतप्रधानांबाबत होणारी चर्चा आणि मोदींबाबत होणारी चर्चा जमीन-आस्मानाचा फरक आहे.