अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासन यंत्रणेचे आवाहन अन्यथा सोमवारी संयुक्तपणे अतिक्रमणे हटविणार:मुख्याधिकारी गौरी पाटील व पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांची माहिती..
कणकवली : व्यापारी संघटना व पालकमंत्री यांच्या झालेल्या बैठकीनंतर नगरपंचायत प्रशासन व पोलीस यंत्रणेने तात्काळ कार्यवाही निर्णय घेतला. त्यानुसार पटवर्धन चौक ते पटकीदेवी पर्यंतच्या मार्गावरील वाहतुकीला अडथळा होणारे अतिक्रमण नागरिकांनी पुढील दोन दिवसांत स्वतः हून हटवावे, अन्यथा सोमवारपासून ते हटविण्यात येणार असल्याचे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील व पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांनी सांगितले.
पटवर्धन चौक ते पटकीदेवीपर्यंतच्या भागात वाहतुकीला होणाऱ्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम या मार्गावरील अतिक्रमण हटण्यिांचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नागरिक, व्यापारी यांनी पुढील दोन दिवसांत म्हणजे शनिवार व रविवारी येथील अतिक्रम, बोर्ड, शेडस् आदी स्वतःहून काढावेत. अन्यथा सोमवार १६ जूनपासून प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, हे अतिक्रमण हटविल्यानंतर नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरामध्ये एकदिशा मार्गाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच सम, विषम तारखांना पार्किंग करण्याबाबतही नियोजन करून निर्णय घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.