⚡मालवण ता.१३-:
मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण सेवाभावी संस्थेच्या विद्यार्थी दत्तक योजनेंतर्गत २०२५-२६ या वर्षाकरिता निवड केलेल्या ७० लाभार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याकरिता ८९ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, आचरा हायस्कूल येथे आयोजित शिक्षण निधी वितरण समारंभात ही मदत सुपूर्द करण्यात आली.
या समारंभाला विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. समारंभाच्या अध्यक्षस्थानी वैभवशाली देव रामेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष मंदार श्रीकांत सांबारी उपस्थित होते. संस्थेचे आचरा परिसर प्रतिनिधी पांडुरंग कोचरेकर आणि रामचंद्र कुबल, रामगड हायस्कूलच्या शिक्षिका अंजली पारकर, न्यू इंग्लिश स्कूलचे प्रा. नीलेश राठोड, संस्थेतर्फे कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, व्यवस्थापक संजय आचरेकर, धर्माजी कांबळी, रवींद्र बागवे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मंदार सांबारी म्हणाले, मुलांनी मोबाईलचा वापर जपून करावा, व सुजाण नागरिक बनण्यासाठी मानवी मूल्ये धारण करून स्वतः सह इतरांसाठी कल्याणकारी जीवन जगावे, असे सांगून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक गोपाळ परब व शाळा व्यवस्थापनाचे शैलेश खांडाळेकर यांनी आभार मानले.