विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करावी…

डॉ. माणिक दिवे:कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा.

⚡कणकवली ता.१३-: पत्रकारांच्या पाल्यांनी विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश संपादन करून स्वत:च्या कुटुंबाचे नाव रोशन केले आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. पत्रकार पाल्यांनी यापुढील शैक्षणिक प्रवासात यशात सात्यय ठेवून आपण जीवनात जे ध्येय ठेवले आहे, त्याच्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.माणिक दिवे यांनी केले.

कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा पंचायत समितीच्या प. पू. भालचंद्र सभागृहात आयोजित केला होता. याप्रसंगी श्री. दिवे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, मराठी राज्य पत्रकार संघाचे परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, गामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता श्री. घेवडे, कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा काळगे, , पोलीस उपनिरीक्षक महेश शेगडे, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, उपाध्यक्ष संतोष राऊळ, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके , सचिव संजय सावंत,जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संतोष वांयगणकर, जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, रमेश जोगळे, नंदू कोरगावकर आदी उपस्थित होते.

मंगेश वालावलकर म्हणाले, पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव करण्याचा तालुका पत्रकार संघाचा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. यापुढील काळात संघाने समाजोपयोगी उपक्रम राबवत रहावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

किशोर गवस म्हणाले, बातम्या मिळविण्यासाठी पत्रकारांना नेहमीच धावपळ करावी लागते. पत्रकारांच्या पाल्यांचा तालुका पत्रकारसंघाने केलेल्या गुणगौरवामुळे त्यांना प्रोत्साहन मिळाले असून हे प्रोत्साहन त्यांना भविष्यात यशाचे शिखर गाठण्यासाठी उपयुक्त ठरेल. कुटुंब व्यवस्थेत अमूलाग्र बदल झाल्याने कुटुंबातील लहान मुलाचे शारीरिक व मानसिक ताण-तणावाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना नैराश्य येते, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येताना आपण भ्रष्टचार अथवा अप्राणिकपणे काम करणार नाही, असा दृढनिश्चिय करून जनतेची सेवा करण्यासाठी प्रशासकीय सेवेत यावे. विद्यार्थ्यांनी देशाचे चांगले नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गणेश जेठे म्हणाले, पत्रकारांच्या पाल्यांनी देशाचे चांगले नागरिक बनून जगात देशाचे नाव रोशन करण्याच्या योगदानात आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन त्यांनी केले.

उमेश तोसरकर म्हणाले, जिल्हा पत्रकार संघ कुटुंबाप्रमाणे प्रत्येक पत्रकाराच्या पाठिंशी खंबीरपणे उभा आहे. पत्रकारांच्या हितासाठी जिल्हापत्रकार संघ काम करीत असून नवीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. कणकवली तालुका पत्रकार संघाचा पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळ्यासह अन्य उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. दहावीच्या परीक्षेत कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विधी विरेंद्र चिंदरकर हिला माणिक दिवे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. आरंभी दर्पणकार आद्य बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला दिवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत पदाधिकारी यांनी केले. प्रास्ताविक भगवान लोके यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत भावे यांनी केले. आभार प्रदर्शन संजय सावंत यांनी केले. यावेळी जिल्हा बॅंकेचे कर्मचारी उदय तावडे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शेवटी अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला पत्रकार व त्यांचे पाल्य व कुटुंबीय उपस्थित होते.

फोटो –
कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचा शुभारंभ करताना सिंधुदुर्ग जि. प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.माणिक दिवे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मंगेश वालावलकर, उमेश तोरसकर, गणेश जेठे, किशोर गवस, संतोष राऊळ, भगवान लोके , संजय सावंत व अन्य तर दुसऱ्या छायाचित्रात गुणवंत विद्यार्थी समवेत मान्यवर

(छाया: मिलिंद निमणकर)

You cannot copy content of this page