सावित्री पालेकर : शिबिराच्या माध्यमातून नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होणार..
⚡आंबोली, ता. १२- : आंबोली येथे दिनांक १२ व १३ जून रोजी निसर्ग पर्यटन गाईड शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबीर आंबोली वनक्षेत्रपाल कार्यालयाच्या वतीने आंबोली येथील वन विश्रामगृह आणि फॉरेस्ट गार्डन येथे भरवण्यात येणार आहे. वनक्षेत्रपाल सौ. प्र. सु. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर भरवले जात आहे. या उपक्रमात आंबोली वनपरिक्षेत्रातील स्थानिक युवकांना निसर्ग पर्यटन गाईड म्हणून प्रशिक्षित करण्यात येणार आहे.
या शिबिरात आंबोली परिसरात आढळणाऱ्या जैवविविधतेविषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. फुलपाखरांबाबत श्री. हेमंत ओगले, उभयचर व सरीसृप याबाबत श्री. महादेव भिसे, पक्ष्यांबाबत कु. भाग्यश्री परब आणि वनस्पतींबाबत श्री. राजेश देऊळकर हे मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागी युवकांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येणार असून, याचा उपयोग त्यांना निसर्ग पर्यटन क्षेत्रात रोजगार मिळवण्यासाठी होणार आहे.
शिबीराचे वेळापत्रक सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असून, आंबोलीत मोठ्या प्रमाणावर निसर्गप्रेमी पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे स्थानिक युवकांसाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे. या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त युवकांनी घ्यावा, असे आवाहन आंबोलीच्या सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी केले असून, त्यांनी याबाबत प्रसिद्धी पत्राद्वारे माहिती दिली आहे.