सराईत चोरट्याकडून कुडाळ परिसरातील सहा चोऱ्याची उकल…

3.50 लाखाचा मुद्देमाल जप्त:कुडाळ पोलिसांची कामगिरी;एसपी डॉ. मोहन दहीकर यांची पत्रकार परिषद..

कुडाळ : कुडाळ पिंगुळी, काळेपाणी, झाराप व साळगांव येथे झालेल्या घरफोडी चोरीच्या गुन्हयाची कुडाळ पोलीसांनी उकल केली आहे. या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी रामचंद्र उर्फ अभय अंकुश घाडी (रा. आकेरी-घाडीवाडी) यास अटक केली आहे. सध्या संशयित आरोपित पोलीस कोठडीत असून दि. ११ जून पर्यंत कोठडीची मुदत आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा घरफोड्याचा तपास केला असून त्यामध्ये साडेतीन लाखाचा ऐवज जप्त केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सिंधुदुर्ग जिल्हयात गेल्या काही दिवसात कुडाळ शहर व परीसरात अनेक ठीकाणी बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केलेले होते. चोरटे बंद घराची कुलुपे तोडून घरातील मौल्यवान वस्तुंच्या चोरीच्या घटनेमध्ये वाढ झालेली होती. घरफोडी चोरीच्या गुन्हयांना आळा बसावा, चोरीचे गुन्हे उघडकीस येवुन चोरी झालेली मालमत्ता हस्तगत होणे आवश्यक होते. घरफोडी, चोरीचे गुन्हे उघडकीस येणेकरीता पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग कृषिकेश रावले यांनी सर्व पोलीस टाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या.
वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात झालेल्या चोरी घर फोडीचे गुन्हे उघडकीस येण्याकरीता वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेप तपास पथके तयार केलेली होती. पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी आपले गोपनीय स्त्रोत सक्रिय केलेले होते. पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मार्फत चोरट्यांबाबत माहीती काढण्याचे कार्य सुरु होते.
मुदतीत कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना त्यांचे गोपनीय स्त्रोतांमार्फत एक संशयीत इसम दुचाकीवरुन परीसरात फिरत असल्याची माहीती व फोटो मिळाला. दुचाकीचे माहीतीवरून संशयीत इसमाचा शोध घेतला असता त्याचे नाव रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी रा. आकेरी, घाडीवाडी ता कुडाळ असे असल्याचे समजुन आले. पोलीसांनी अभिलेखाची पडताळणी केली असता त्याचेवर सावंतवाडी पो. ठाण्यात घरफोडीचे तीन गुन्हे दाखल असल्याची माहीती मिळून आली. यावरुन या इसमाचा चोरीच्या गुन्हयात सहभाग असण्याची शक्यता असल्याने त्याचा शोध घेत असता तो झाराप झिरो पॉईन्ट या टिकाणी येणार असल्याची माहीती प्राप्त झाल्यानंतर त्यास सापळा रचुन पो. नि. मगदुम व पथकाने त्यास शिताफीने दि. ८ जून २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान संशयीत आरोपीत याने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. पण त्यास विश्वासात घेवुन तपास करता त्यांने गेल्या काही दिवसात पिंगुळी सुधा रेसीडन्सी, पिंगुळी उत्कर्षनगर, पिंगुळी काळेपाणी, पिंगुळी मोडकावड चिंदरकरवाडी, झाराप तिठा, व साळगांव खेरवाडी अशा एकूण सहा ठिकाणचे बंद घराची कुलुप तोडून सहा गुन्हे केल्याची कबुली दिली.
आरोपीत याचेकडून चोरीस गेलेल्या तीन अॅड्रॉईड TV, 27 ग्रॅम सोन्याचे दागिने, 13,200/- रु. किं. चे चांदीचे दागिने, 03 मोबाईल फोन, 01 टॅब, 02 सोनी कंपनीचे कॅमेरे, 01 रेडीओ, 02 स्पिकर, 01 वजनकाटा, 43000/- रु रोख रक्कम तसेच गुन्हा करण्याकरीता वापरलेल्या 02 लोखंडी कटावण्या, 02 स्क्रू ड्रायव्हर, 02 पक्कड, 01 कटर तसेच गुन्हे करण्यासाठी वापरलेली TVS N टॉर्क क्र. MH-07-AU-6859 ची दुचाकी असा एकूण 3,50,000/- रु (साडे तीन लाखाचा) किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
मुदतीत आरोपीत यास मा न्यायालयात हजर केले असता त्याची दि. 11.06.2025 रोजी पर्यंत (04 दिवस) पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले व उप विभागीय पोलीस अधिकारी, कणकवली घनशाम आढाव यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, सहा. पोलीस निरीक्षक पालवे, पोलीस उपनिरीक्षक भांड, पोलीस अंमलदार प्रमोद काळसेकर, कृष्णा केसरकर, रामदास गोसावी, योगेश वेंगुर्लेकर, गणेश चव्हाण, महेश भोई, योगेश मांजरेकर, शशीशेखर प्रभु, योगीता गोलतकर यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page