माजी मुख्याध्यापक एम. डी. मोरबाळे यांचे समाजासाठी मोठे पाऊल”
⚡बांदा ता.०३-: बांदा येथील खेमराज प्रशाळेचे माजी मुख्याध्यापक एम. डी. मोरबाळे यांनी आपल्या कुटुंबियांच्या पूर्वपरवानगीने मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ओरोस येथील शरीररचनाशास्त्र विभागात त्यांनी याबाबत रीतसर प्रक्रिया पूर्ण केली आहे. यासाठी त्यांना सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सदस्य तथा नियमित रक्तदाते नीलेश मोरजकर यांनी सहकार्य केले आहे.
श्री मोरबाळे हे शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना समाज कार्यात विशेष आवड आहे. त्यांनी आपल्या सेवाकाळात खेमराज प्रशालेत अनेक शैक्षणिक व भौतिक गरजा उपलब्ध करून दिल्या आहेत. सेवानिवृत्तीनंतरही ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. आपल्या मृत्युंनंतर आपल्या शरीरावर कोणतीही अंतिम क्रिया किंवा विधी न करता आपले शरीर दान करावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. यासाठी त्यांना कुटुंबियांनी देखील साथ दिली आहे.
त्यांनी याची कल्पना पत्रकार नीलेश मोरजकर यांना दिली. श्री मोरजकर हे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान या संस्थेत सक्रिय असून ही संस्था रक्तदाना सोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देहदान, अवयवदान चळवळ राबवत आहे. श्री मोरजकर यांनी देखील काही वर्षांपूर्वी आपला अवयवदान संकल्प केला असून त्याची रीतसर प्रक्रिया देखील केली आहे. श्री मोरबाळे यांनी याची पूर्ण कल्पना आपले नातेवाईक व मित्रपरिवार यांना दिली आहे.
कोट:-
जिवंतपणी आपण समाजासाठी कार्यरत असतोच. मात्र आपल्या पच्छात देखील आपले शरीर इतरांसाठी कामाला यावे याच उदात्त हेतूने आपण मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या विद्यार्थ्यांनीदेखील माझ्या संकल्पाचा आदर करत देहादानाचा किंवा अवयवदानाचा निर्णय घ्यावा.
फोटो:-
बांदा येथे मरणोत्तर देहदानाचा संकल्प केलेले एम डी मोरबाळे. सोबत नीलेश मोरजकर.
