⚡सावंतवाडी ता.०२-: गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या समाजबांधवांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत नाडकर्णी यांनी या उपक्रमाची माहिती दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव व्हावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी येत्या ८ जून २०२५ पर्यंत आपली नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेने केले आहे.
या सत्कार समारंभासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वडील किंवा आई हे संस्थेचे सदस्य असणे आवश्यक आहे. इच्छुक व्यक्तींनी विद्यार्थ्याचे गुणपत्रक (छायाप्रत) आणि संपर्क क्रमांक यासह आवश्यक कागदपत्रे श्री. संतोष हनुमंत पई, सबनीसवाडा, सावंतवाडी या पत्त्यावर प्रत्यक्ष पाठवावीत किंवा ९४२३२६७०१८ या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे जमा करावीत.
गौड सारस्वत ब्राह्मण समाजाने शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच भरीव योगदान दिले आहे आणि हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्याच परंपरेचा भाग आहे. या सत्कारामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवी प्रेरणा निर्माण होईल आणि समाजासाठी ही गौरवाची बाब ठरेल, असे मत श्री. नाडकर्णी यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी येथील जयानंद मठकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार शिवराज्याभिषेक दिन सोहळा
सावंतवाडी: येथील जयानंद मठकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सहा जूनला शिवराज्याभिषेक दिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार साजरा
सावंतवाडीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा होणार आहे. संस्थेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून श्री मुकुंद सीताराम कामत मार्गदर्शन करणार आहेत, तर संस्थेचे प्राचार्य श्री प्रशांत जयानंद मठकर यांच्यासह उपप्राचार्य, गटनिदेशक आणि सर्व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. संस्थेने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम येत्या ६ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे.
