MIDC बांधत असलेल्या गटारातच बसवली सेप्टिक टॅंक…

नगरसेविका संध्या तेरसे यांची कारवाईची मागणी..

कुडाळ : शहरात एमआयडीसी बांधत असलेल्या चौपदरी रस्त्याच्या गटारातच चक्क नवीन सेप्टिक टॅंक बसविण्यात आली आहे. या घटनेकडे नगरसेविका संध्या तेरसे यांनी लक्ष वेधले आहे. ज्याने ही सेप्टिक टाकी बसविली आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सौ. तेरसे यांनी केली आहे.
कुडाळमध्ये एमआयडीसीच्या रस्त्यालगत गटाराचे बांधकाम सुरु असून एक प्रशस्त रस्ता गटारासहित बांधला जात आहे. एस एन देसाई चौक ते महामार्ग या रस्त्यावर प्रथमेश कॉम्प्लेक्सलगत बांधत असलेल्या गटारात थेट सेप्टिक टॅंक टाकण्यात आला आहे. पण संबंधित यंत्रणेला याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नाही. काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला पण माहिती नाही. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे सौ. तेरसे यांनी विचारणा केली असता, ती सेप्टिक टॅंक काढून टाकायला सांगितले आहे, अशी माहिती देण्यात आली.
कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यावर एमआयडीसीच्या जागेत थेट राजरोसपणे रस्त्याच्या गटारात अतिक्रमण करताना कुठल्या कारवाईची तमासुद्धा न बाळगता हे घडत आहे आहे, ही नक्कीच खेदाची बाब आहे. आता लक्षात आल्यावर पण ती टाकी संबंधित कॉन्ट्रॅक्टर कडून काढून घेण्यात येणार आहे. म्हणजे ज्या कोणी ही टाकी बसवली त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही का? असा सवाल सौ. संध्या तेरसे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याचे सौ. तेरसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page