महावितरणचा उपअभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात…

कुडाळ मध्ये अटकेची कारवाई:पाच हजाराची मागितली लाच..

कुडाळ : सोलार पॅनलच्या चेकलिस्टवर सही करण्याकरिता कुडाळ महावितरण विभागातील उपकार्यकारी अभियंता तथा लोकसेवक विजय नरसिंग जाधव याला पाच हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आली. त्याच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय नरसिंग जाधव याने तक्रारदारांकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार अँन्टी करप्शन विभागाकडे आल्यानंतर त्या तक्रारीची शहानिशा करून श्री.जाधव याला अँन्टी करप्शन ब्युरो, सिंधुदुर्गच्या पथकाने ताब्यात घेतले व भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 (सुधारित अधिनियम 2018) चे कलम 7 प्रमाणे कुडाळ पोलीस स्थानकात  गु.र. नं. 166/2025  अन्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवारी सकाळी 11 वा.च्या सुमारास कुडाळ महावितरण विभागाच्या कार्यालयात केली.
       तक्रारदार हे अल्पी पोलराइज्ड टेकसोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे सोलरचे काम करतात. तक्रारदार यांनी बसवलेल्या सोलार पॅनलचे चेकलिस्टवर सही करण्यासाठी लोकसेवक श्री. जाधव याने दि. 6 में 2025 रोजी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार अँन्टी करप्शन ब्युरो, सिंधुदुर्गकडे येताच त्यांनी दोन दिवस तक्रारीची पडताळणी केली व मंगळवारी कुडाळ महावितरण विभागातील उपकार्यकारी अभियंता तथा लोकसेवक विजय नरसिंग जाधव याला ताब्यात घेत अटक करून कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला.
       ही कारवाई अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्रचे शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, ठाणेचे  संजय गोविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो सिंधुदुर्गचे पोलीस उपधीक्षक अरुण पवार, लाच प्रतिबंध विभाग सिंधुदुर्गचे सापळा अधिकारी मनोज जिरगे, पोलिस हवालदार अजित खंडे, जनार्दन रेवंडकर, पोलिस नाईक प्रथमेश पोतनीस, महिला पोलिस स्वाती राऊळ, रविकांत पालकर यांनी केली .
कोणत्याही शासकीय अधिकारी,कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अँन्टी करप्शन ब्युरो, सिंधुदुर्गचे पोलीस उपधीक्षक अरुण पवार यांनी केले आहे.

You cannot copy content of this page