विनोद सातार्डेकर यांनी कीर्तनातून दिली संविधानाची माहिती..
मालवण (प्रतिनिधी)
संविधान कायद्याचे राज्य सुनिश्चित करते आणि कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला कायद्यापेक्षा जास्त अधिकार मिळत नाही, हे स्पष्ट करते. संविधान देशाची ओळख आणि मूल्ये दर्शवून देशाच्या नागरिकांमध्ये एकात्वाची भावना निर्माण करते. संविधान देशात राजकीय स्थिरता आणि सुव्यवस्था निर्माण करते असे प्रतिपादन कीर्तनकार विनोद सातार्डेकर यांनी संविधान हा विषय कीर्तनातून मांडताना केले.
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने कांदळगाव येथील सिद्धार्थ विकास मंडळातर्फे जागर संविधानाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी कीर्तनकार विनोद सातार्डेकर यांनी संविधानाचे महत्त्व पटवत उपस्थिताना व्यवहारी दाखले देत हसत खेळत कीर्तनात गुंतवले. संविधान या विषयावरती कीर्तनकार करणारे सिंधुदुर्गातील पहिले कीर्तनकार म्हणून आणि संविधान विषयाला अनुसरून कीर्तन केले म्हणून उपस्थित रसिकांनी शाबासकी दिली. या संविधान कीर्तनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी विनोद सातार्डेकर यांनी आपल्या कीर्तनातून संविधान विषय मांडताना संविधान नागरिकांना मूलभूत हक्क आणि अधिकार प्रदान करते. बोलण्याचा अधिकार, मत व्यक्त करण्याचा अधिकार, समानता, आणि न्याय मिळवण्याचा अधिकार संविधान देते. संविधान सत्तेला मर्यादित करते आणि कोणताही व्यक्ती किंवा संस्था सत्तेचा गैरवापर करू शकत नाही, हे सुनिश्चित करते. ते न्यायपालिका, कार्यपालिका आणि विधानमंडळ यांमध्ये शक्तीचे विभाजन करते, ज्यामुळे सत्तेचा गैरवापर होण्याची शक्यता कमी होते, असे सांगितले. तसेच संविधान सामाजिक न्यायासाठी कार्य करते आणि समाजातील गरीब आणि दुर्बळ लोकांसाठी संरक्षण सुनिश्चित करते. संविधान देशात संघराज्य आणि लोकशाही पद्धत स्थापित करते. संविधान हे कोणत्याही देशासाठी एक आवश्यक दस्तऐवज आहे. ते देशाच्या स्थिरतेसाठी, नागरिकांच्या हक्कांसाठी, आणि सामाजिक न्यायासाठी आवश्यक आहे, असेही सातार्डेकर यांनी सांगितले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष विकास कदम,संदीप कदम ,नितीन कदम, राजेंद्र कदम, उदय कदम, रोहन कदम ,तुषार कदम, मंगेश कदम, हेमंत कदम, त्रिशाला कदम आदी तसेच सम्राट अशोक नगर रांजणगाव येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.