⚡बांदा ता.०२-: येथील गोगटे-वाळके कॉलेज, बांदाच्या अर्थशास्त्र विभाग प्रमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. रश्मी काजरेकर यांना इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी, बेळगाव (कर्नाटक) व रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन, बेळगाव या संस्थेच्यावतीने राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार नुकताच गोवा येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्राध्यापिका रश्मी काजरेकर या गेली ३० वर्षे गोगटे -वाळके कॉलेज, बांदा येथे कार्यरत आहेत. एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापिका म्हणून त्यांचा लौकिक आहे. अर्थशास्त्र विभाग प्रमुख पदाबरोबरच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या त्या कित्येक वर्षे कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत युवा पिढीमध्ये विविध उपक्रम राबवून त्याच्यात नेतृत्वगुण विकसित करण्यात व राष्ट्रीय कार्यात युवकांना सज्ज करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. या विभागामार्फत त्यांनी ग्रामीण भागात समाजाभिमुख अनेक उपक्रम राबविले आहेत. समाज जागृती अंतर्गत पथनाट्य, शासनाच्या अनेक योजना तळागाळात, ग्रामीण पातळीवर पोहचविण्यात त्यांचा वाटा आहे. तसेच त्यांनी महिला विकास कक्षाच्यामार्फत युवतींच्या, महिलांसाठी आरोग्य शिबिरे, समाजातील गरजू , आजारी महिलाना आर्थिक मदत करणे, कोरोना कालखंडात गरीब आर्थिक व कपडे इतर वस्तूंच्या माध्यमातून हातभार लावत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
त्यांनी आतापर्यंत काॅलेजमधील अनेक गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी आर्थिक मदत दिली आहे. त्या कोलगावच्या माजी सरपंच आहेत. सदर गावात शासनाच्या अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन सदर संस्थेने त्यांना नुकतेच सन्मानित केले आहे. सन्मानचिन्ह, मानाचा फेटा , सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ मंडळाचे अध्यक्ष डी. बी. वारंग, उपाध्यक्ष प्रमोद कामत, सचिव एस. आर. सावंत व सर्व पदाधिकारी, प्राचार्य डाॅ. गोविंद काजरेकर, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
