⚡मालवण ता.१७-:
पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेच्या अंमलबजावणीसाठी निर्माण केलेल्या सागरमित्र पदावरील नियुक्त सागरमित्रांची मुदत ३१ मार्च रोजी संपल्याने पंतप्रधान मत्स्यसंपदा योजने अंतर्गत सागरमित्र नियुक्ती तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी भाजप मच्छिमार सेलचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.
पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना सन फेब्रुवारी २०२१ ते सन ३१ मार्च २०२५ या कालावधी दरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविली जात आहे. मत्स्यसंपदा योजना सर्वसामान्य मच्छिमार, मत्स्यव्यवसायिक, मत्स्यशेतकरी यांच्यापर्यंत पोहोचवणे व त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे, तांत्रिक कामकाज यासाठी सागरमित्र म्हणून पद नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्त सागरमित्रांमुळे पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेची प्रभावी अंमलबजावणी शक्य झाली. सदरची नियुक्ती ही अकरा महिने कंत्राटी पदरी कालावधीसाठी आहे. सद्यस्थितीत कार्यान्वित असणाऱ्या सागरमित्र यांचा कालावधी ३१ मार्च २०२५ रोजी संपलेली आहे. त्यामुळे पंतप्रधान मत्स्य संपदा योजने अंतर्गत सागरमित्र नियुक्ती तात्काळ व्हावी. तसेच मागील कालावधीत कार्यरत असलेल्या सागरमित्र यांना प्राधान्य मिळावे, अशी मागणी रविकिरण तोरसकर यांनी केली आहे.
