मालवण : (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील सागरी जलधी क्षेत्रात मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील अंदाजे ८ ते ९ सागरी मैल समुद्रात अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील दोन एल.ई.डी. लाईट नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने करवाई केली आहे. दोन्ही नौका तसेच नौकांवरील अंदाजे ७ लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे.
याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाने दिलेल्या माहितीनुसार दि. १६ एप्रिल रोजी रात्री मालवण समोर मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी रविंद्र मालवणकर (मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, दांडी मालवण) हे समुद्रात नियमित गस्त घालत होते. यावेळी रत्नागिरी येथील परवाना असलेल्या नौका हाजि जावेद (नों. क्र.- IND-MH-४-MM-5843) व YM-मातिन-H-इस्माईल (नों. क्र.- IND-MH-४-MM-5409) या दोन नौकांद्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्रात अंदाजे ८ ते ९ सागरी मैल येथे अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे मासेमारी करत असताना अंमलबजावणी अधिकारी रवींद्र मालवणकर यांच्या पथकाने पकडले. अधिकारी श्री. मालवणकर यांनी मालवण पोलिस ठाणे येथील पोलिस कर्मचारी श्री. हरमलकर तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांच्या सहकार्याने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे.
पकडलेल्या दोन्ही नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. दोन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण ६५ खलाशी आहेत. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करून सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधदुर्ग कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. तसेच सदर नौकांना ५ ते ६ लक्ष दंड होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या कोर्टात ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती मत्स्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
