ताराराणी यांच्या कार्याची ओळख देण्यासाठी रणरागिणी ताराराणी नाटक…

निर्माता ब्रिगेडियर सुधीर सावंत:१२ एप्रिल पासून सिंधुदुर्गात प्रयोग..

ओरोस ता ७
औरंगजेबाला महाराष्ट्रात कोणी गाढले, याचा उलगडा करणारा इतिहास रणरागिणी ताराराणी या नाटकाद्वारे होणार आहे. ताराराणी यांचा इतिहास कोणालाही माहीत नाही. तो महाराष्ट्रातील जनतेला कळावे, यासाठी हे नाटक पडद्यावर आणण्यात आले आहे, अशी माहिती रणरागिणी ताराराणी नाटकाचे निर्माते तथा छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ व सरस्वती एज्युकेशन सोसायटी मुंबई अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात ब्रिगे. सावंत यांनी रणरागिणी ताराराणी नाटकाबद्दल माहिती दिली. यावेळी किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ विलास सावंत, शास्त्रज्ञ सुयश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान अधिकारी अब्दुल शेख आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ब्रिगे. सावंत यांनी महाराष्ट्राचा गौरवशाली शिवइतिहास घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने, कर्त्या व्यक्तींच्या असामान्य कर्तुत्वाने. त्यात कर्त्या स्त्रियांचा देखील महत्त्वाचा सहभाग होता. अशाच स्त्रियांपैकी एक म्हणजे जगातील सर्वात मोठी स्त्री योद्ध्या महाराणी ताराराणी! स्वराज्याची वीरांगणा, मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे ज्यांचे वर्णन केले गेले आहे. अशा महाराणी ताराराणींची गाथा आता मराठी रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. आपल्या कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या रणरागिणी ताराराणी यांचा इतिहास भव्य नाट्यरूपाने उलगडण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घेतला आहे.
ताराराणीचा इतिहास जनसामान्यांपासून दुर्लक्षित राहिला आहे. त्यांचा प्रचंड पराक्रम नव्या पिढीपर्यंत येणे गरजेचे आहे. आपला दैदीप्यमान इतिहास जगभरात पोहचावा या उद्देशाने मी या नाटकाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. मराठेशाहीचे स्थैर्य आणि छत्रपती ताराराणी यांनी समर्थपणे राखलेली मराठेशाहीची गादी यावर आधारित असलेल्या ‘रणरागिणी ताराराणी’ या नाटकात ५० कलाकारांची फौज आहे. यात छत्रपती संभाजी राजे, छत्रपती राजाराम राजे, छत्रपती ताराराणी अशी २४ पात्रे दिसणार आहेत. सिंधुदुर्गच्या रंगमंचावर या नाटकाचे देखणे प्रयोग पहायला मिळणार असून नाट्य रसिकांना एक वेगळा आनंद मिळेल, असा विश्वास ब्रिगे. सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

You cannot copy content of this page