संजू परबांची जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या उत्साहात सत्कार…

⚡सावंतवाडी, ता. २०-: संजू परब यांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याने सावंतवाडीत मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या निवडीनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत फटाक्यांची आतषबाजी केली आणि ढोल-ताशांच्या गजरात विजय उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. संजू परब यांना भगवी शाल, शिवध्वज आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत आगामी काळात पक्षसंघटनेस मजबूती देण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

जिल्हा संपर्कप्रमुख सचिन वालावलकर यांनी परब यांच्या निवडीबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की, जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी त्यांची ही निवड उपयुक्त ठरेल. पक्षसंघटना अधिक बळकट होण्यासाठी परब यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरणार असून, आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड योग्य दिशेने उचललेले पाऊल आहे.

अनोराजीन लोबो यांनी परब यांचे कौतुक करत सांगितले की, त्यांनी पक्षसंघटनेसाठी समर्पित राहून काम केले आहे. त्यांची काम करण्याची पद्धत प्रभावी आहे आणि पक्षाच्या हितासाठी ते नक्कीच अधिक प्रयत्न करतील. मात्र, त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर महिलांना योग्य तो सन्मान मिळेल, याचीही काळजी घ्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संजू परब यांनी आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, ही निवड त्यांच्या वैयक्तिक पदासाठी नसून, संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांसाठी आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान राखत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहतील. त्यांनी आपल्या भाषणात पक्षासाठी प्रत्येक शिवसैनिकाला न्याय मिळावा, यासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी सांगितले की, संजू परब यांची निवड झाल्यानंतर पक्षसंघटनेस अधिक बळकटी मिळेल. ते केवळ बोलण्यात नव्हे तर प्रत्यक्ष कृतीत विश्वास ठेवणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचा फायदा संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला तालुकाप्रमुख नारायण राणे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर, गजानन नाटेकर, प्रतीक बांदेकर, परीक्षित मांजरेकर, भारतीय मोरे, सुहासिनी सौदागर, नंदू शिरोडकर, देव्य सूर्या, सुधन कटणकर, प्रेमानंद देसाई, क्लॉट्स फर्नांडीस, दिनेश सावंत, नितीन मांजरेकर, गणेशशरण गावस, सुरेश डुबळे, प्रतीक बांदेकर, अजित पोळके, रोहित पोळके, वर्धन पोळके, निखिल सावंत, साईल वाडकर, विनायक प्रभुगांवकर, संदीप निवळे, प्रथमेश प्रभू, स्वप्निल परब आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page