Headlines

आचरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा महिला गौरव पुरस्कार सौ. मिताली कोरगावकर यांना जाहीर…

⚡मालवण ता.१२-: आचरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, (फेस्कॉम संलग्न) तर्फे देण्यात येणारा महिला गौरव पुरस्कार आचरे पिरावाडी येथील उद्योजिका सौ. मिताली प्रशांत कोरगावकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण २० मार्च रोजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वार्षिक मेळाव्यात सकाळच्या सत्रात लौकिक सांस्कृतिक सभागृह (हॉटेल सिरॉक), आचरे येथे होणार आहे.

सौ. मिताली कोरगावकर या उद्योजिका असून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या गेली पंचवीस वर्षे कार्यरत आहेत. बचत गटाच्या प्रमुख म्हणून त्यांनी महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती आचरा पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघांचे कार्यवाह जॅकारीएस फर्नांडिस यांनी दिली.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी असून प्रमुख मान्यवर म्हणून डॉ. सुभाष दिघे, मालवण हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्येष्ठांना डॉ. दिघे हे मार्गदर्शन करणार असून ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा ‘स्वरयात्रा’ हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. दिघे यांचे हस्ते होणार असून सदर कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समारंभाचे निमंत्रक तथा उपाध्यक्ष सुरेश गावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page