भाजपची ‘ती’ कृती निषेधार्ह…

मंदार शिरसाट:माझ्यासाठी विषय संपला; आता लक्ष्य कुडाळच्या विकासाकडे..

कुडाळ : महाविकास आघाडीच्या कुडाळमधील लोकनियुक्त नगरसेवकांना फोडून आपल्या पक्षात घेण्याची भाजपाची कृती निषेधार्ह आहे. पण माझ्यासाठी तो विषय कालच संपला आहे. टीकाटिपणी करण्यात आणि आरोप प्रत्यरोपात मला काडीचाही रस नाही. शहराच्या विकासासाठी मी अखेरपर्यंत झटत राहणार आहे. असे युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांनी प्रसद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. शिरसाट म्हणतात, गेल्या दहा वर्षांपासून मी राजकारण आणि समाजकारणात आहे. मी कधीच कोणत्याही व्यक्तीवर किंवा पक्षावर पातळी सोडून टीका केली नाही. धोरणत्मक विरोध केला आणि जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने केली. रचनात्मक राजकारण हेच माझे ध्येय आहे.
युवासेना जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना संघटना बांधणीबरोबरच तरुणांच्या हाताला काम देण्याचा मी प्रयत्न केला. नगरसेवक म्हणून अभिनव नगर परिसरात मी केलेली जनहिताची कामे नागरिकांच्या समोर आहेत. कामाचा हा झपाटा यापुढेही असाच कायम ठेवणार आहे.
शहराच्या राजकारणात कितीही बदल झालेला असला तरी माझी भूमिका कधीच बदलणार नाही. आरोग्य सभापती म्हणून आणखी एक वर्ष मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा बदलू शकत नाहीत. या पदाच्या माध्यमातून शहरवासियांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी हाती घेतलेली जागृती मोहीम पुढे चालू राहणार आहे. गप्पी मासे ठिकठिकाणी सोडले जाणार आहेत. भांगसाळ नदीतील गाळ काढण्यासाठी शासन दरबारीं पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच पर्यटनमध्ये मंजूर असलेला भंगसाल नदी येथील गणेश घाट देखील लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असे श्री. शिरसाट म्हणतात.
मंदार शिरसाट म्हणतात, मी ठाकरेशी एकनिष्ठ आहे. चमत्कार झाला नाही म्हणून देव बदलणारा मी कार्यकर्ता नाही. शिवसेना म्हणजे ठाकरे ही माझी श्रद्धा आहे. पैसे कमावण्यासाठी मी राजकारणात आलेलो नाही. आज नगरसेवक भाजपात गेलेले असले तरी शहरातील सामान्य मतदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. दोन वर्षांनी होणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीत सोबत असलेल्या शिवसैनिकांना घेऊन इर्षेने लढा दिला जाणार आहे. उद्धवसाहेब, आदित्य साहेब यांच्यावर विश्वास ठेऊन शहरवासीय पुन्हा ठाकरेच्या शिवसेनेची सत्ता आणतील हा माझा विश्वास आहे, असे मंदार शिरसाट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page