बाळू नाटेकर यांची ना. नितेश राणेंकडे मागणी..
मालवण (प्रतिनिधी)
मालवण मधील आडारी नदी गाळाने संपूर्ण भरून गेलेली आहे. आडारी नदी पर्यटन दृष्ट्या महत्वाची असल्याने आडारी नदीतील गाळ उपसा करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) मालवण शहरप्रमुख बाळू नाटेकर यांनी मत्स्य व बंदरे विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.
मालवण शहरालगत असलेली आडारी नदी ते कोळंब खाडी हा भाग पर्यटन दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. सध्या आडारी नदी संपूर्ण गाळाने भरुन गेलेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका होऊ शकतो. या नदीमधील गाळ उपसा झाल्यास बोटींग सारखा पर्यटन व्यवसाय होवू शकतो. तसेच मासेमारी व्यवसायही करता येईल. नदी गाळाने भरल्यामुळे पाणी थांबत नसल्यामुळे बोटींग सारखा व्यवसाय करु शकत नाही. हजारो कुटुंबे या नदी मुळे आपला पर्यटन, मासेमारी व्यवसाय करुन रोजगार मिळवू शकतात. तरी आडारी नदीतील गाळ उपसा करण्याबाबत पाठपुरावा करून न्याय द्यावा, अशी मागणी बाळू नाटेकर यांनी निवेदनातून केली आहे.
