सिंधुदुर्गनगरी दि. 20 : जागतिक आरोग्य संघटने मार्फत 25 एप्रिल हा जागतिक हविताप दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करणेत येतो. हिवताप व इतर किटकजन्य आजाराबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण होवून प्रतिबंधात्मक उपायोजनेच्या अमंलबजावणीमध्ये जनतेचा सक्रीय सहभाग व सहकार्य घेणे हा दिन साजरा करण्याचा मुळ उद्देश आहे. यासाठी वर्षीचे घोषवाक्य ‘हिवताप निर्मुलन हेच उदिष्ठ’ असे घोषित करणेत आलेले आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमेश कर्तस्कर यानी दिली. उन्हाळयात पाणी टंचाईमुळे पाणी साठवून ठेवण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे झाकून न ठेवलेल्या पाणी साठयात डासनिर्मिती सुरू होते. पावसामुळे जागोजागी पाणी साठून रहाण्याचे प्रमाण वाढते व डासांची पैदास मोठया प्रमाणावर होते. त्यामुळे पावसाळयात हिवताप (मलेरिया), डेंग्यु, चिकुनगुनिया या डासांमार्फत पसरणाऱ्या आजारामध्ये वाढ झालेली आढळून येते. डासांच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी समाजातील सर्व स्तरावरुन सर्वंकष प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी जनतेच्या सक्रीय सहभागाची नितांत गरज आहे. या आजाराच्या नियंत्रणासाठी डासांचे प्रमाण कमी असणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील सूचना प्रमाणे कार्यवाही करणे समाजाकडून अपेक्षित आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्यापासून सुरवात करावी हा या वर्षीच्य मोहिमेचा उद्देश आहे. आपल्या आजूबाजूला डासांचे प्रमाण कमी होणे यासाठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. घराच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारचे पाणी (घाण, स्वच्छ) आठ दिवसा पेक्षा जास्त दिवस साठून रहाणार नाही याची दक्षता घ्यावी. पाणी साठवण्याची भांडी आठवडयातून एकदा घासून पुसून कोरडी करुन पुन्हा भरावीत. सर्व पाणी साठे घट्ट झाकून ठेवावेत. जे साठे रिकामे करता येत नाहीत किंवा झाकून ठेवता येत नाहीत त्यात गप्पीमासे सोडावेत. हे मासे डासांच्या अळया खातात. हे मासे सर्व प्राथमिक आरोग्या केंद्रात मोफत मिळतात. डास प्रतिबंधात्मक मलम, कॉईल, मच्छरदाणी यांचा वापर करावा. व्हेंटपाईपला जाळ्या बसविण्यात याव्यात. याबाबतची दक्षता प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा ताप हा हिवताप मलेरिया, डेंग्यु, चिकुनगुनिया असू शकतो. म्हणून ताप आल्यास त्वरीत शासकिय वैद्यकिय संस्थेत रक्त तपासून घेणे गरजेचे आहे. या आजारावरील औषधोपचार शासकीय दवाखान्यात मोफत दिला जातो. हिवताप साथ उद्रेक झाल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजने करिता आवश्यक औषधसाठा व किटकनाशके जिल्हास्तर व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. यासाठी ग्रामीण स्तरापासून मोठ्या शहरापर्यत सर्व स्तरावर किटकजन्य आजार व करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती, साठवलेल्या पाण्यामुळे होणारी डासनिर्मिती, कोरडा दिवस पाळण्याचे महत्व, जैविक उपाय योजनांची गरज, गप्पी मासे पैदास व वापर, अळीनाशकाचा वापर, वैयक्तिक सुरक्ष, डासोत्पत्ती स्थानांची ओळख व ती नष्ट करणे बाबत आवश्यक ते आरोग्य शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. या साठी शासकीय यंत्रणे बरोबरच इतर सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे.
हिवताप निर्मुलन हेच उदिष्ठ
