ठाकरे शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..
सिंधुदुर्गनगरी ता २०
करूळ घाट वाहतुकीस बंद असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या घाटातील एकरी वाहतूक येत्या आठ दिवसात सुरू करा. या मागणीसह विविध प्रश्नांकडे आज माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
करूळ घाटातील रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. मात्र ते मंद गतीने सुरू असल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. हा घाट मार्ग येत्या आठ दिवसात सुरू करा. अशी मागणी करण्यासाठी तसेच घाटाची सुरू असलेले काम नीत्कृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे आज उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन लक्ष वेधले . यावेळी माजी आमदार वैभव नाईक, राजन तेली, सतीश सावंत, संदेश पारकर, जीजी उपरकर यांच्यासह उद्धव सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत आमदार वैभव नाईक यांनी करूळ घाटाचे काम वाहतूक बंद करून केले जात असल्याने मोठी गैरसोय झाली आहे. फोंडाघाट, भुईबावडा घाटही नादुरुस्त आहे. त्यामुळे करूळ घाटाचे काम जलद गतीने पूर्ण करून येत्या आठ दिवसात या घाटातून वाहतूक सुरू करा. या घाटात आठ ते दहा मजुरांमार्फत रस्त्याचे काम सुरू आहे. अशाने घाट मार्गाचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे करुळ घाटातील एकरी वाहतूक सुरू करा. अशी मागणी यावेळी वैभव नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र जिल्हाधिकारी यांनी आपण स्वतः या घाट मार्गाच्या रस्त्याची पाहणी करून खात्री करतो, त्यानंतर एकरी वाहतूक सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. असे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले . यावेळी जिल्ह्यातील वाळू लिलाव तसेच अवैधरीत्या सुरू असलेली वाळू उत्कलन याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले, असता परवानगी घेऊन वाळू काढताना स्थानिक नागरिक विरोध करतात मात्र हीच वाळू विनापरवाना काढताना विरोध करत नाहीत. यामुळे वाळू पट्ट्यांचे लिलाव करताना प्रतिसाद मिळत नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
