चिवला बीच येथे दोन कासव मृतावस्थेत सापडली…

⚡मालवण ता.१८-:
मालवण चिवला बीच येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीची दोन समुद्री कासव मृतावस्थेत आढळून आली. याबाबत स्थानिक नागरिक कैतान सोज यांनी मालवणमधील वन्यजीव प्रेमी व कोकण वाइल्ड रेस्क्यूअरच्या सल्लागार सौं. शिल्पा यतीन खोत यांना माहिती दिली असता सौ. खोत यांनी वन, कांदळवन आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी चिवला बीच येथे दाखल होत मृत कासवांची पाहणी करून ताब्यात घेतले.

अलीकडच्या काळात समुद्रात वाढलेल्या प्रदूषणामुळे समुद्रातील तुटलेल्या जाळ्यात कासव अडकल्याच्या घटना घडतात. किंवा प्लास्टिक मुळे कासवांचा मृत्यू ओढवतो. मात्र चिवला बीच येथे आढळलेल्या मृत कासवांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा, याचे कारण समजू शकले नाही. यावेळी देवली येथील कांदळवन वनसंरक्षक नम्रता कोळी, मालवणचे उपजीविका तज्ज्ञ केदार पालव, पशुधन पर्यवेक्षक श्री. लांडगे, मालवण वनपाल सदानंद परब, कांदळगावचे वनरक्षक लक्ष्मण आमले आदी अधिकाऱ्यांनी चिवला बीच येथे दाखल होऊन या मृत कासवांची पाहणी केली. या कासवांच्या मृत्यूबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून पुढील तपास करण्यात येणार आहे. यावेळी सौ. शिल्पा खोत, कैतान सोज, नीलम शिंदे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page