⚡मालवण ता.१४-: वाळू साठ्याची निविदा प्रक्रिया होत असली तरीही कालावल खाडीतील तोंडवळी येथे चिन्हांकित पॉईंट बी ३, बी ४ येथे सातत्याने अवैधरित्या वाळूचा उपसा अहोरात्र केला जात आहे. याबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी लक्ष वेधून देखील प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे या अवैध वाळू उपशावर कारवाई व्हावी या मागणीसाठी दि. १५ जानेवारी रोजी तोंडवळी वरची करंजेवाडी येथे खाडीच्या पाण्यात उतरून साखळी उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा तोंडवळी येथील ग्रामस्थानी मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
कालावल खाडी पात्रात तोंडवळी व हडी येथे अवैध वाळू उपसा होत आहे. टेंडर मालकांसहित त्यांच्या हाताखाली असलेले होडी मालक सुद्धा ग्रामस्थाना दादागिरी करत आहेत. जमावाने घरी येऊन धमक्या देण्याचे प्रकारही होत आहेत. या सर्व प्रकाराबाबत प्रशासनाचे लक्ष वेधून देखील कारवाई करण्यात आलेली नाही. कारवाई होण्यासाठी यापूर्वी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार आज दि. १४ रोजी खाडीच्या पाण्यात उतरून साखळी उपोषण छेडण्याचा इशारा दिला होता, मात्र आज मकरसंक्रान्त असल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले असून ते दि. १५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता छेडण्यात येणार आहे, असे ग्रामस्थानी निवेदनात म्हटले आहे.
