मनिष दळवी:बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक युवा महोत्सव ‘प्रभोत्सव‘उत्सव कलागुणांच्या कार्यक्रमाचं थाटात उद्घाटन..
⚡वेंगुर्ला ता.०४-: मुलांनी शिक्षणाबरोबरच आपल्यामध्ये असलेले सुप्त गुण अशा सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या माध्यमातून सादर करावेत. यशस्वी नागरीक बनण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याकरीता शैक्षणिक व व्यावसायीक पाया मजबूत करावा लागेल. जिल्ह्यातून सर्व महाविद्यालयीन युवकांसाठी सामुहिक युवा महोत्सवाचे आयोजन करण्याचा मानस आहे. त्यालाही विद्यार्थ्यांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले.
येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक युवा महोत्सव ‘प्रभोत्सव‘उत्सव कलागुणांचा‘ या कार्यक्रमाचे उद्घाटन सिधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष सचिन वालावलकर, सरपंच पपू परब, सांस्कृतिक युवा महोत्सव समितीचे चेअरमन प्रा.राजाराम चौगले, प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, प्रा.विरेंद्र देसाई, पर्यवेक्षक प्रा.डी.जे.शितोळे, विद्यार्थी मंडळ सचिव पवनकुमार राणे, विद्यार्थीनी प्रतिनिधी सोनाली चेंदवणकर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात विविध कार्यक्रमामध्ये भाग घेतल्याने त्यांना मिळालेला अनुभव भविष्यात उपयोगी पडतो. शिक्षण घेत असताना भविष्याचा विचार करून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सदैव प्रयत्न करावे आणि ध्येयाकडे वाटचाल करून आपले व महाविद्यालयाचे नांव लौकिक करावे असे मत सचिन वालावलकर यांनी व्यक्त केले. जीवनात प्रत्येक माणासावर प्रेम करा. आपुलकी, जिव्हाळा जपा आणि आपल्या यशाकडे वाटचाल करा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांनी केले. संगीत व गीत गायनाने मनाची शांती, मनातील सकारात्मकता व मनाची एकाग्रता वाढविण्यास मदत होते. समाधान ही एक संपत्ती असून जो माणूस समाधानी असेल तो आपले सुखी जीवन जगतो असे मत प्रा.राजाराम चौगले यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, चेअरमन प्रा.डॉ.मंजिरी मोरे-देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई यांनी ‘प्रभोत्सव -उत्सव कलागुणांचा‘ या सांस्कृतिक महोत्सवास शुभेच्छा दिल्या.
