⚡वेंगुर्ला ता.०३-: विद्यार्थ्यांनी आत्मपरिक्षण करून योग्य दिशेने पाऊल टाकावे. तसेच स्वतःला घडविण्याची क्षमता स्वतःमध्ये तयार करावी असे उद्गार संमेलनाचे अध्यक्ष माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर यांनी काढले.
येथील रा.कृ.पाटकर हायस्कूल आणि रा.सी.रेगे ज्युनिअर कॉलेज तंत्र व व्यवसाय अभ्यासक्रमाचे वार्षिक स्नेहसंमेलन २८ डिसेंबर रोजी संपन्न झाले. यावेळी व्यासपिठावर माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक राजन गावडे, अॅड.नंदन वेंगुर्लेकर, शालेय समित अध्यक्ष साईप्रसाद नाईक, पालक वासुदेव केरकर, मुख्याध्यापक एस.आर.धुरी, शालेय मुख्यमंत्री संकेत परूळेकर व सांस्कृतिक मंत्री अश्मिरा दोस्ती आदी उपस्थित होते.
शाळेकडे ठेवलेल्या नलिनी दत्तात्रय वेटे यांच्या ठेवीतून व निर्मला नारायण परांजपे यांच्या ठेवीतून मिळालेल्या व्याजातून व शिक्षकांच्या देणगीतून आठवी ते बारावीतील प्रथम तीन क्रमांकांना, हुशार व होतकरू दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रूपये तर शाळेतील पाच विद्यार्थ्यांना आदर्श्रा विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला. बेस्ट कॅडेट म्हणून मकरंद वेंगुर्लेकर याची निवड करण्यात आली. धनश्री निकम, साध्वी भिडे, नवनीत मठकर हे आदर्श विद्यार्थी ठरले. रंगावली प्रदर्शनातील प्रथम पाच क्रमांकांना रोख पारितोषिके देण्यात आली. माजी शिक्षिका यशवंती सावंत यांच्या स्मरणार्थ डॉ.दिपाली काजरेकर यांनी मराठी विषयात प्रथम येणारी निर्जरा वेंगुर्लेकर हिला रोख ५०० रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी वराडकर व साळगांवकर सर यांचा सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे राजन गावडे यांनी आपण नोकरी व्यतिरिक्त व्यवसायात चांगले करिअर करू शकतो असे सांगितले. कैवल्य पवार, अॅड.नंदन वेंगुर्लेकर यांनी शाळेबद्दल गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन, ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.महेश बोवलेकर यांनी, शालेय प्रगतीचा अहवाल वाचन मुख्याध्यापक एस.आर.धुरी यांनी तर आभार प्रा.विलास गोसावी यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, निवृत्त प्राध्यापक तुषार कामत, माजी विद्यार्थी अश्वेता माडकर, संदिप परूळेकर व इतर पालक उपस्थित होते.
फोटोओळी – पाटकर हायस्कूलच्या स्नेहसंमेलनाला मान्यवर उपस्थित होते.
