स्थानिक आमदारात राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच हा मतदारसंघ पर्यटन विकासापासून वंचित…

अर्चना घारे परब; पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी केवळ एकदा संधी द्या…

⚡सावंतवाडी ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्याला भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर होऊन 27 वर्ष झाल्यानंतर देखील या जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी कोणतेही काम येथील स्थानिक आमदाराने गेल्या 15 वर्षात केले नसल्याची जोरदार टीका अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी आज केली आहे.

यावेळी त्या म्हणाल्या की, प्रामुख्याने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वेंगुर्ला येथील सागरेश्वर, शिरोडा वेळागर, मिठाच्या सत्याग्रहाची महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, ज्येष्ठ नाटककार स्व. जयवंत दळवी यांचे आरवली गाव, ज्येष्ठ साहित्यिक वि. स खांडेकर यांची भुमी, सावंतवाडी संस्थान, आंबोली हील स्टेशन, मांगेली धबधबा, सावंतवाडीतील ऐतिहासिक मोती तलाव, विविध धार्मिक स्थळे इत्यादी भागांचा विकास करून पर्यटन व्यवसायाला चालना देणं सहज शक्य होते. परंतु, येथील जनतेला गृहीत धरून चालणाऱ्या आमदाराने गेली 15 वर्ष केवळ आमदारकी उपभोगली. सत्ता आणि मंत्रीपद असूनही केवळ राजकीय इच्छाशक्ती नसल्याने पर्यटन व्यवसायाला खऱ्या अर्थाने चालना मिळू शकली नाही. असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. या भागातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी मला फक्त एकदा संधी द्या असे आवाहन देखील अर्चना घारे परब यांनी यावेळी केले आहे.

You cannot copy content of this page