⚡बांदा ता.०७-: गेल्या दहा वर्षात अपेक्षित विकासकामे न झाल्याने व वेळोवेळी वाडीतील समस्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आल्याने बांदा शहरातील सटमटवाडी ग्रामस्थांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकत मतदान न करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. तसेच वाडीत प्रचारासाठी येणाऱ्या कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला प्रवेश न देण्यासंदर्भात देखील ठराव घेण्यात आला आहे.
सटमटवाडीतील अनेक समस्या या जैसे थे आहेत. याबाबत वेळोवेळी लोकप्रतिनिधी यांना लेखी तसेच तोंडी कल्पना देण्यात आली आहे. मात्र वाडीतील समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. मुंबई गोवा महामार्गवरून वाडीत येणाऱ्या बोगद्याच्या शासकीय कामाच्या आराखड्यात देखील बदल करण्यात आला आहे. सेवा रस्ता देण्यात न आल्याने ग्रामस्थांचे हाल होणार आहेत. शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी हे स्थानिकांना विश्वासात न घेता आपल्या मार्जिनुसार काम करत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे.
यासाठीच येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीला वाडीतील सर्व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वाडीत प्रचारासाठी येणाऱ्या पक्षाचे उमेदवार किंवा पदाधिकारी यांना मज्जाव करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. सटमटवाडीत ४०० हून अधिक मतदार असून या वाडीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र आहे.
बांदा सटमटवाडी ग्रामस्थांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर घातला बहिष्कार…
