मला जे आशीर्वाद व प्रेम दिलात तेच निलेश राणे यांना द्या…

खास. नारायण राणे:मालवणात महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन..

मालवण (प्रतिनिधी)

लोकसभा निवडणुकीवेळी माझ्या प्रचारासाठी मालवणात ज्या जागेत प्रचार कार्यालय होते त्याच जागेत निलेश राणे यांच्या प्रचाराचे कार्यालय सुरु केले आहे. त्यामुळे माझ्या विजयाप्रमाणेच निलेश राणेही विजयी होऊन पुढच्या वेळी आमदार म्हणून या कार्यालयात येतील. आपल्याला महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आणायचे आहे, त्यामुळे मला जे आशीर्वाद व प्रेम दिलात तेच निलेश राणे यांना द्या असे भावनिक आवाहन माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी मालवण येथे महायुतीच्या प्रचार कार्यालय उदघाटन प्रसंगी बोलताना केले.

मालवण येथे दैवज्ञ भवन नजीक महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व खासदार नारायण राणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, रणजित देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, मालवण कुडाळ क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, भाजप शहराध्यक्ष बाबा मोंडकर, किसन मांजरेकर, प्रीतम गावडे, सोनाली पाटकर, आदी तसेच भाजप व शिवसेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी खास. नारायण राणे म्हणाले, महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार आले पाहिजे. दुसरे सरकार येऊन चालणार नाही. विरोधक सुडाचे राजकारण करत आहेत. त्यांच्या कडे अडीज वर्षे सत्ता होती, पण तेव्हाचे मुख्यमंत्री अडीज दिवस पण मंत्रालयात गेले नाहीत. इथला आमदार निष्क्रिय आहे. इथली विकास कामे मीच केली आहेत. राज्यातील महायुतीसरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी ज्या एकजुटीने काम केले तसेच काम आता महायुतीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी केले पाहिजे. जे कार्यकर्ते चांगले काम करतील, मेहनत करतील त्यांच्या कार्याची जाण आम्ही ठेवू, त्यांना योग्य ती पदे देऊ असेही नारायण राणे म्हणाले.

निलेश राणे म्हणाले, पुढचे पंधरा दिवस महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांशी जमवून घेऊन समन्वयातून काम करायचे आहे. वातावरण चांगल आहे, चांगल काम मालवण मध्ये चालू आहे. या प्रचार कार्यालयाची जागा जशी नारायण राणे यांना लकी ठरली तशी मलाही लकी ठरो, निवडणूक खेळीमेळीची वाटत असली तरी ती आतमध्ये खेळीमेळीची नसते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफिल न राहता, नियोजन बद्ध काम करावे असेही निलेश राणे म्हणाले. तर शिंदे शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे यांनी कार्यकर्त्यांनी २० तारीख पर्यंत आपली इतर कामे बाजूला ठेवून निवडणुकीसाठी मेहनत घ्यावी, कुडाळ मालवण मतदार संघात मोठ्या मताधिक्याने विजय मिळवूया, ज्या वॉर्ड मध्ये निलेश राणे यांना जास्त मते पडतील तिथल्या कार्यकर्त्यांना नारायण राणे यांच्याकडून बक्षीस दिले जाईल, असे सांगितले. सूत्रसंचालन राजा गावकर यांनी केले.

You cannot copy content of this page