कुडाळ शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक संतोष शिरसाट यांनी व्यक्त केले मत..
कुडाळ (प्रतिनिधी)
आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ शहरासाठी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. मात्र, हे नारायण
राणे यांच्या हातात सत्ता असताना जमले नाही. त्यामुळे आमदार वैभव नाईक हे तिसऱ्यांदा आमदार व्हावेत ही कुडाळवासीयांची प्रामाणिक इच्छा आहे, असे परखड मत कुडाळ शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक संतोष शिरसाट यांनी व्यक्त केले.
यावेळी संतोष शिरसाट बोलताना म्हणाले की, खासदार नारायण राणे २५ वर्षे मुख्यमंत्री, महसुलमंत्री, दुग्धविकास मंत्री, पालकमंत्री, केंद्रीय मंत्री आणि आता न सापडणारे खासदार असताना कुडाळ शहरातील प्रलंबित प्रश्न त्यांना दिसले नाहीत. त्याचबरोबर कुडाळ शहर ग्रामपंचायत, नंतर कुडाळ शहर नगरपंचायतीवर त्यांची सत्ता असताना काही करु शकले नाही.
शिरसाट पुढे म्हणाले की, राणेंचे पुत्र आणि आताचे शिंदे शिवसेना प्रवेशकर्ते झालेले निलेश राणे पाच वर्षे खासदार होते. असे असताना त्यांनाही कुडाळ शहरातील विकासकामे दिसली नाहीत. परंतु, आमदार वैभव नाईक यांनी भंगसाळ नदी बंधारा बांधून देऊन कुडाळ शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटवला. भंडारी समाजाचे भवन देणारे त्यावेळचे माजी पदाधिकारी आणि आता शिंदे गटाचे मंत्री यांनी आश्वासन दिले. मात्र, आमदार वैभव नाईक यांनी भंडारी समाजाचे भूषण असलेले कै. मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृह बांधले आणि कुडाळ शहरवासीयांना नाट्यगृहाची व्यवस्था करुन दिली. कुडाळ बसस्थानकाची अवस्था आम्ही लहानपणापासून बघत होतो. परंतु, आमदार वैभव नाईक यांनीच कुडाळ बसस्थानक देखणे बांधले, ऐतिहासिक घोडेबाव बांधली, कुडाळ शहारातील सुसज्ज क्रीडांगण ( क्रिकेट ग्राउंड) बॅडमिंटनपटूंसाठी व्यवस्था, नगरपंचायतीच्या माध्यमातून सुसज्ज गार्डन, गणेश घाट अशी कोट्यवधी रुपयांची कामे करुन कुडाळवासीयांचे आशीर्वाद घेऊन कामे करत असताना आपण सुचवलेली कामे कुडाळ शहरातील अपूर्ण रहाता नये याची दक्षता घेत वेळ प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेटही घेत होते. त्यावर विरोधकांनी पण केली. पण शहराच्या विकासासाठी टिकेला भिक घातली नाही आणि कुडाळ शहराचा कायापालट करताना कुडाळवासीयांना सोबत घेत आरोग्याचा प्रश्न सुटावा यासाठी महिला रुग्णालय सुसज्ज बांधून आज गोरगरीबांच्या आरोग्याचा प्रश्न आमदार नाईक यांनी सोडवला. तसेच कुडाळ शहरात मारूती मंदिर येथे भक्त निवासासाठी १ कोटी रुपये व कुडाळेश्वर मंदिरासाठी ३ कोटी रुपये मंजूर करून घेतले. कुडाळ भंगसाळ नदीचे सुशोभीकरण यासाठी सुध्या निधी आणला. ते पण लवकरच पुर्ण होईल. कुडाळच्या जनतेला शांत संयमी सर्व लोकांत मिसळणारा व कुणालाही त्रास न होणारा आमदार पाहिजे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तिस-यांदा आमदार वैभव नाईक निवडून देणार हे कुडाळवासियांनी निश्चय केल्याचे शिरसाट यांनी सांगितले.
