शिंदे शिवसेनेच्या ताब्यातील देवबाग ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश…!

⚡मालवण ता.२९-: मालवण तालुक्यातील शिंदे शिवसेनेच्या ताब्यात असलेली एकमेव देवबाग ग्रामपंचायतच्या सरपंच उल्हास तांडेल यांसह उपसरपंच तात्या बिलये आणि ग्रा.पं. सदस्य रुपाली मोंडकर, प्रतिक्षा चोपडेकर, दत्तात्रय केळुसकर यांनी शिंदे गटाला सोडचिट्ठी देऊन श्री.रमेश कद्रेकर यांच्या माध्यमातून आम.वैभव नाईक व माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत मशाल हाती घेत ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे आम. नाईक यांनी शिवबंधन बांधुन पक्षात स्वागत केले आहे. शिंदे गटातील स्थानिक उमेदवाराला उमेदवारी न देता भाजपच्या आयात उमेदवाराला संधी दिल्याने नाराज होत व आम. नाईक यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आपण पक्षप्रवेश करत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले.

यावेळी देवबाग सरपंच उल्हास तांडेल म्हणाले, मालवण तालुक्यात शिंदे गटाच्या ताब्यात देवबाग ही एकच ग्रामपंचायत होती. तरी देखील सातत्याने पक्ष नेतृत्वाने गळचेपी केली, कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले नाही. तसेच कुडाळ मालवणची जागाही शिंदे गटाच्या वाट्याला येऊन देखील त्या ठिकाणी भाजपच्या आयात उमेदवाराला संधी दिल्यामुळेच आपण नाराज होऊन आम. नाईक यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्याचप्रमाणे आ. वैभव नाईक यांनी देवबाग मध्ये विविध विकास कामे केली असल्याने आम. नाईक यांच्या पाठीशी राहून त्यांना देवबाग मधून मी आणि माझे सहकारी मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार करत असल्याचेही तांडेल यांनी सांगितले.

यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, देवबाग वासियांनी राणेंच्या भ्रष्टाचाराचा पैसा न घेता, भ्रष्टाचाराचे साथी न बनता स्वाभिमानी सरपंच श्री.तांडेल यांच्या पाठीशी उभे राहून आम. नाईक यांची मशाल ही निशाणी निवडून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असेही ते म्हणाले.

यावेळी आम. वैभव नाईक म्हणाले, की माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास येथील सरपंच,उपसरपंच,ग्रा. सदस्य व कार्यकर्त्यांनी दाखवला त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करतो. मी व माझे सहकारी तांडेल यांचा मानसन्मान राखून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. यापुढील काळातही आपण देवबागचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आम. नाईक म्हणाले.

तांडेल यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता आम्ही केलेला विकास पाहून त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. देवबागसह कोकणात तौक्ते वादळाने होत्याच नव्हत करून लोकांचे जनजीवन विस्कळीत केले होते, तेव्हा राणे कुटुंब कुठेही दिसले नाही. मात्र आपण येथील जनतेच्या खंबीरपणे पाठीशी राहून भरीव मदत करून तौक्तेग्रस्तांना ६५ कोटीचे पॅकेज मिळवून दिले. त्याचप्रमाणे आपण येथील हॉटेल व्यवसायिकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहुन त्यांच्यावर कुठलीही कारवाई करू दिली नाही. देवबाग मध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील आपण नगरपालिकेतुन देवबाग साठी नळपाणी योजना मंजूर करून सोडवला आहे. भूमिगत वीज वाहिन्या, धुपप्रतिबंधक बंधारे अशी कोट्यावधी रूपयांची अनेक विकास कामे आपण केली असून या पुढील काळात देखील देवबागच्या विकासासाठी काम करत राहू, असेही आम. नाईक यांनी सांगितले.

यावेळी सरपंच उल्हास तांडेल, उपसरपंच तात्या बिलये, ग्रामपंचायत सदस्य रूपा मोंडकर,दत्तात्रय केळुसकर,प्रतीक्षा चोपडेकर,नाना तांडेल,एन्जॉय तुळसकर,रुपेश लोंढे,उत्तम केळुस्कर शेखर कांदळगावकर,गणेश सातोसकर,कीर्तिवान केळुसकर, दशरथ राऊळ,हेमंत राऊळ,संजय सावंत,नितेश केळुसकर,विशाल केळुसकर,पार्थ राऊत,कुशाल साळगावकर,संतोष राणे,राजू कुबल, केशव खोबरेकर,पायाजी साळगावकर,किशोर राऊळ,हेमंत राणे,हेमंत साळगावकर,वैष्णव केळुसकर,रोहित रोगे,परशुराम राऊळ, मंगेश खोबरेकर,मुकुंद कोळंबकर,सदाशिव राऊळ या प्रवेशकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. याप्रसंगी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,जिल्हा प्रवक्ते मंदार केनी,माजी बांधकाम सभापती यतीन खोत,काँग्रेस तालुका प्रमुख जेम्स फर्नांडिस,शहरप्रमुख बाबी जोगी आदि व शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page