मनसेच्या विशाल ओटवणेकर यांचा इशारा..
मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरात माय लेकावर कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडून यात लहान मुलाच्या पायाचा कुत्र्यांनी चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाली आहे. मालवण शहरातील भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत यापूर्वी मनसेने वेळोवेळी नगरपालिकेचे लक्ष वेधूनही नगरपालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून कोणतीही कार्यवाही केलेली नाही. नगरपालिकेने येत्या १५ दिवसात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा मनसेतर्फे मालवण नगरपरिषदेसमोर तीवर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे माजी मालवण शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
मालवण शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून याबाबत मनसेने लक्ष वेधून सुद्धा मालवण नगरपरिषद प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा परिणाम आज बघायला मिळत असून मालवण मधील लहान मुलावर वा त्याच्या आईवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून मुलाच्या पायाला चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाली आहे. ही अतिशय भीतीदायक घटना आहे. रस्त्यांवर गाडीसमोर कुत्रे आल्याने बरेच अपघात देखील झाले आहेत. असे वारंवार घडत असतानाही न. प. प्रशासन त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे. कुत्र्याने लहान मुलावर हल्ला केल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मालवण नगरपरिषदेने येत्या १५ दिवसात भटक्या कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा अन्यथा मनसे तर्फे मालवण नगरपरिषदेच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे विशाल ओटवणेकर यांनी म्हटले आहे.
