राष्ट्रीय कला उत्सव 2024 च्या राष्ट्रीय दिशा निर्देशक पुस्तिकेवर श्रेया चांदरकर हिची कलाकृती..
मालवण दि प्रतिनिधी
कट्टा येथील वराडकर हायस्कूल या प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी श्रेया चांदरकर हिची कलाकृती राष्ट्रीय कला उत्सव 2024 च्या राष्ट्रीय दिशा निर्देशक पुस्तिकेवर झळकली असून श्रेया चांदरकर हिची कलाकृती पुस्तकेवर झळकल्याने वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे
भारतीय शिक्षा मंत्रालयातर्फे दरवर्षी कला उत्सवाचे राष्ट्रीय स्तरावर आयोजन केले जाते. या कला उत्सवात भारतातील सर्व राज्यांमधील कलाकार आपली कला सादर करतात. सन 2023 -24 मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कला उत्सवात कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनी कुमारी श्रेया समीर चांदरकर व सानिया अनिल कुडतरकर यांनी त्रिमित शिल्प व खेळणी बनवणे या कला प्रकारातून राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
सन 2024- 25 च्या कला उत्सवाचे माहितीपत्रक कला उत्सव च्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आले आहे. या माहिती पुस्तिकेत विविध कला प्रकारांची विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सन 2023- 24 मध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचे व त्यांच्या कलाकृतींची छायाचित्रे राष्ट्रीय माहिती पुस्तिकेत छापलेली आहेत.
गतवर्षी श्रेया चांदरकर हिने भारताचे माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे व्यक्तीचित्र मातीच्या माध्यमातून बनवलेले होते. साऱ्या जगाला आश्चर्याचा धक्का देणारी चांद्रमोहीम भारताने यशस्वीरित्या राबवली. याच विषयावर आधारित तिचे हे त्रिमितीय शिल्प महाराष्ट्रात अव्वल ठरले. व सन 2024- 25 च्या माहिती पुस्तिकेत ही कलाकृती स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे
