१५ ऑक्टोबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन:जिल्हयातील दोन तर बाहेरील पाच संघाना मिळणार प्रवेश..
⚡कुडाळ ता.३१-: बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ या नोंदणीकृत हौशी नाट्यसंस्थेच्या वतीने ‘बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव-२०२५’ दि. ७ जानेवारी ते १३ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी इच्छूक नाट्य संस्थांनी १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्रवेशिका पाठवाव्यात असे आवाहन संस्थेचे कार्यवाह केदार सामंत यांनी केले आहे. या महोत्सवात सिंधुदुर्गातील दोन तर जिल्ह्याबाहेरच्या ५ संघाना प्रवेश देण्यात येणार आहे.
या महोत्सवाचे हे २७वे वर्ष असून या महोत्सवाने महाराष्ट्रभर स्वतःचे असे विशेष स्थान निर्माण केले आहे. कुडाळचे सांस्कृतिक वैभव ठरलेल्या या महोत्सवाचे उत्तम व्यवस्थापन हे खास वैशिष्ट्य आहे. या महोत्सवाची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती झाली असून, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ही या महोत्सवाची आणखी एक जमेची बाजू आहे.गेल्या २७ वर्षात महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा येथील नामवंत नाट्यसंघांनी या महोत्सवात आपली नाटके सादर केली आहेत.
भारतातील कोणत्याही राज्यातील नोंदणीकृत हौशी नाट्यसंस्थांना, मराठी गद्य नाटकांसाठी हा महोत्सव खुला असून या महोत्सवाच्या अंतिम फेरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २ व सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील ५ अशा एकूण ७ संघांना प्रवेश देण्यात येणार आहे. या महोत्सवातील अंतिम फेरीत प्रवेश मिळालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघास सादरीकरणानंतर रु. २०,०००/- व सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील संघास सादरीकरणानंतर रु. ३०,०००/- एवढी रक्कम निर्मिती सहाय्य म्हणून देण्यात येईल. शिवाय महोत्सवासाठी निवडलेल्या संघांची कुडाळमधील प्रयोगादिवशीची चहा, भोजन, निवास याची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येईल. याबरोबरच सहभागी संघास स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. या महोत्सासाठी प्रवेश फी आकारली जात नाही.
इच्छूक संघांनी विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दि. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पाठविणे आवश्यक आहे. ह्या स्पर्धेत अंतिम फेरीत एकूण फक्त सातच निवडक संघांना प्रवेश दिला जाणार असून त्यासाठी आयोजक संस्थेचे निवड मंडळ सर्व इच्छुक संघांचे नाट्यप्रयोग अगर रंगीत तालिमी दि. २० नोव्हेंबर २०२४ ते ०५ डिसेंबर २०२४ या कालावधीत पाहून निवड करणार आहेत. निवड झालेल्या संघाना दि. ०५ डिसेंबर २०२४ पर्यंत प्रवेशाबाबत कळविण्यात येईल.
इच्छुक संघांनी स्पर्धेची नियमावली, माहितीपत्रक व प्रवेश अर्जासाठी कार्यवाह, नाट्यमहोत्सव आयोजन समिती, बाबा वर्दम थिएटर्स, द्वारा श्री. आनंद वैद्य, ‘निलेंदू’, अॅक्सीस बँकेच्या मागे, कुडाळ- ४१६५२०, जि. सिंधुदुर्ग. मोबाईल क्र. ९८२२३०९८८७ / ८२७५३९०९०९ यांचेशी संपर्क साधावा किंवा bvtkudal53@rediffmail.com या पत्त्यावर e-mail पाठवावा.असे आवाहन बाबा वर्दम थियेटर्सच्या वतीने करण्यात आले आहे.
