पहाटे ३ वाजल्यापासून पावसाने लावली हजेरी:आंबा बागायतदार चिंताग्रस्त..
⚡मालवण ता.०९-:
कोकण पट्ट्यात अवकाळी पावसाने तारांबळ उडवली असताना आज पहाटे मालवण तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. काल रात्रीपासून ढगांचा गडगडाट सुरु झाल्यावर पहाटे ३ वाजल्यापासून पावसाने हजेरी लावल्याने मालवण वासियांची झोप उडाली. या पावसामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत.
मालवणात पहाटे ३ वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस सकाळी ६ वाजेपर्यंत कोसळत होता. रात्री झोपेत असताना अचानक पाऊस सुरु झाल्याने नागरिकांची झोप उडाली. पावसाने दमदार हजेरी लावत अधून मधून ढगांचा गडगडाटही सुरु होता. यावेळी वीज पुरवठा देखील खंडीत झाला होता. सध्या थंडी चा हंगाम असताना या पावसामुळे वातावरणात आणखीनच गारवा पसरला. पहाटेच्या पावसानंतर मालवणात दिवसभर ढगाळ वातावरण व थंडावा होता. आज सायंकाळी देखील पुन्हा पावसाने रिमझिम हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
सध्या कोकणात आंबा पिकाचा बहरण्याचा हंगाम सुरु असताना या अवकाळी पावसामुळे आंबा पिकावर परिणाम होण्याच्या भीतीने आंबा व्यावसायिक चिंतेत सापडले आहेत. आता पडणारा अवकाळी पाऊस हा पाऊस वादळी असल्याने तो अधून मधून पडत आहे, या पावसाचा तेवढा परिणाम आंबा पिकावर होणार नाही, पाऊस सतत व मुसळधार पडल्यास आंबा पिकावर विपरीत परिणाम होईल, अशी माहिती मालवण मधील कृषी जाणकार विलास हरमलकर यांनी दिली आहे. तसेच या पावसामुळे वातावरणात बदल झाल्याने तुडतूडा किटकाचे प्रमाण वाढून ते आंबा पिकासाठी हानिकारक ठरू शकते, मात्र या पावसाचा एक फायदाही असून या हलक्या पावसामुळे हवेतील नत्र आंब्याच्या झाडाला मिळून आंबा फळाची वाढ चांगली होऊ शकते असे मतही हरमलकर यांनी व्यक्त केले आहे.
